चार महिन्यापूर्वी लग्न… वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी मृत्यू
पती, दिराकडून पोलिस मॅनेज
बुलढाणा, 14 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : पुण्यातील मावळ तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बुलढाण्यात पुनरावृत्ती झाली आहे. जांभरुण रोड भागात राहणार्या भगवान बुडकुले यांची मुलगी मयुरीचा (वय 23 वर्षे) जळगावांत हुंड्यापायी बळी गेला आहे. पती गौरव किशोर ठोसर, दीर, सासू आणि सासरे यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळापायी मयुरीने गळफास घेऊन जीवन संपविले. चार महिन्यापूर्वीच मयुरीचा विवाह झाला… संसारही नीटसा फुलला नव्हता आणि लग्नात 5 लाख रुपये हुंडा देऊनही माहेरच्यांकडून पुन्हा 10 लाख रुपये घेऊन ये, म्हणून अतोनात छळ सुरु झाला… माहेरचे आधीच आर्थिकदृष्ट्या खचलेले.. मोबाईलवर बोलण्याला प्रतिबंध… बायको सोडून दिलेल्या दिराची वाईट नजर… सासू-सासर्याचे दिवसरात्र टोमणे… ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली तो नवराच सतत मारहाण करतो… अशा परिस्थितीत मयुरीच्या मनाचा कोंडमारा झाला आणि या नवविवाहितेने मृत्यूसमान झालेल्या जीवनापेक्षा मृत्यूचा फास निवडला. इकडे मृतक मयुरीच्या वडिलांनी सासरच्या मंडळीवर मयुरीचा बळी घेतल्याचा आरोप लावला आहे. जळगांव खान्देश पोलिस स्टेशन मॅनेज असून पतीसह इतर आरोपींना वाचविण्याचा संबंधित तपास अधिकारी आणि पोलीस कर्मचारी प्रयत्न करीत असल्याची खळबळजनक तक्रारही जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आले आहे. दुसरीकडे, मयुरीच्या हुंडाबळी प्रकरणामुळे संवेदनशील बुलढाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. सर्वत्र #justice for mayuri हा ट्रेंड सुरू झाला आहे.जळगाव शहरातील सुंदर मोती नगर परिसरात सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यात तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दुसर्या दिवशीचं तिने आपलं जीवन संपवलं.मयुरी गौरव ठोसर असे आत्महत्या करणार्या विवाहितेचे नाव आहे. लेकीनं आत्महत्ये केल्याचं समजताच तिच्या आई वडीलांसह भावाने जिल्हा रुग्णालय परिसरात आक्रोश करत टाहो फोडला. त्यावेळी सर्व जण सुन्न झाले होते.
सासरच्या लोकांकडून मयुरीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तसेच पैशांची देखील मागणी केली जात होती, असा आरोप मयुरीच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी सासरच्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी विवाहितेच्या आई-वडिलांनी केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत विवाहितेचे शवविच्छेदन करण्यास माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. पोलिसांना तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता मयुरीच्या कुटुंबियांनी केली आहे.
सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. तिच्या लग्नाला अवघे चार महिनेच झाले होते. नुकताच तिचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला. त्याच्या दुसर्याच दिवशी तीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सासरचे लोक तिला मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. याची तक्रार मयुरीने आपल्या कुटुंबीयांनाही केली होती. शिवाय सातत्याने पैशांची मागणी करण्यात येत होती. यातून तिचा छळ होत असल्याचा आरोप मयुरीचा कुटुंबियांनी केला आहे.
सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे अलिकडच्या काळात घडली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. तिच्या सासू सासर्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. असं असलं तरी असा घटना थांबायचे नाव घेत नाहीत. त्या होतच असल्याचं आता मयुरीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समोर आलं आहे. अशा स्थितीत मयुरीला न्याय मिळाला पाहीजे अशी मागणी जळगाव खांदेश व बुलढाण्यामधून होत आहे. या घटनेनंतर तिचे सासरचे लोक पोलिसांना भेटले नाहीत.