देशभरातील तीन लाख ग्रामपंचायतींतून मिळवला अव्वल क्रमांक
बुलढाणा, 26 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२५ मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९९७ पासून सुरू झालेल्या या मालिकेतील ही २८ वी राष्ट्रीय परिषद ठरली.
या श्रेणीत देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अव्वल ठरून, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.) यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला. हा सन्मान केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वर्षीच्या परिषदेमधील वैशिष्ट्य म्हणजे—पहिल्यांदाच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी (ग्रामपंचायतींसाठी) ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीवर आधारित स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. आणि अभिमानाची बाब म्हणजे, या नव्या श्रेणीत संपूर्ण देशात प्रथम क्रंमाक प्राप्त करून सुवर्ण पुरस्कार मिळवून नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील, रोहिणी ग्रामपंचायतने ऐतिहासिक यश संपादन केले. सांगली येथे येण्यापूर्वी, श्री नरवाडे धुळे जिल्ह्याचे सीईओ म्हणून कार्यरत होते.या सुवर्ण पुरस्कारामध्ये १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. राष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेला हा सन्मान विशाल नरवाडे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा दाखवली :
a) गावासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे पूर्णपणे ऑनलाइन सेवा वितरण. गावकरी ग्रामपंचायत कार्यालय ला जाण्याची आवश्यकता नाही.
b) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक अंगणवाडी
c)“माझी पंचायत अॅप” द्वारे तक्रार निवारण
d) “निर्णय अॅप” द्वारे ग्रामसभा निर्णयांचे ऑनलाइन प्रकाशन
e) डिजिटल साक्षरतेसाठी गावात समर्पित आयसीटी लॅब
अशा विविध उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीत पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिक समाधान यामध्ये विलक्षण प्रगती झाली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सीईओ विशाल नरवाडे यांचे नाव आज देशपातळीवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
बुलडाणा जिल्ह्याची पार्श्वभूमी
विशाल नरवाडे हे मूळचे आपल्या जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यातील सावळी गावचे आहेत. त्यांनी २०२४ मध्ये जिल्हा परिषद, बुलडाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या अल्पावधी कार्यकाळातच, त्यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षा एका अनोख्या पद्धतीने आयोजित करून डिजिटल ई-गव्हर्नन्सबद्दलची त्यांची समर्पणता दिसून आली होती. कॉपीमुक्त परीक्षा आयोजित करण्यात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी श्री नरवाडे यांनी झूम तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व परीक्षा वर्गांचे थेट निरीक्षण केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असल्याने, ते त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात सुशासन सुनिश्चित करण्यासाठी जास्तीत जास्त डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पूर्णपणे समर्पित आहेत.



