spot_img

नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीला घेवून भाईजींची मोठी घोषणा ‘माझ्या परिवारात….’

बुलढाणा, १० ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) ः सत्तेसाठी कोण, कधी आणि कुठल्या थराला जाईल याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला मागील काळात आलेली आहे. निवडणूक लढण्यासाठी हपापलेल्यांची संख्याही कमी नाही.. सत्तेच्या सारीपाटावर ज्याला त्याला आपली गोटी फिट करायची आहे.. तिकीट मिळविण्यासाठी लाचारी, गद्दारी, मक्कारीच्या सर्व सीमा पार करतांना आपण अनेकांना पाहीले आहे. अशा काळात मात्र भाईजींसारखी काही व्यक्तीमत्वे अशीही आहेत, ज्यांच्यासाठी पक्ष उमेदवारीचे तिकीट घेवून तयार असतात. त्यांना निवडणूकीसाठी आग्रह केला जातो. आपल्या पक्षाकडून भाईजींनी निवडणूक लढावी, म्हणून वरिष्ठ नेतेमंडळी प्रयत्नशील असतात. खासदारकी, आमदारकीच्या निवडणूकांच्या वेळेस त्यांना विचारणा होत असते. आता नगर परिषदेच्या निवडणूकांचा बिगुल वाजला आणि पुन्हा एकदा भाईजींकडे नेत्यांनी मनधरणीला सुरुवात केली आहे. केवळ भाईजीच नव्हे तर परिवारातील इतर सदस्यांनाही तिकीट देण्यासाठी नेते तत्पर असतात. अर्थातच याचे कारण म्हणजे भाईजींना सहकाराच्या माध्यमातून जनतेसोबत समृद्ध केलेले नाते आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून घराघरांशी त्यांनी जपलेले ॠणानुबंध आणि असंख्य प्रकारच्या सामाजिक सेवांमधून जपलेला सेवाभावसुद्धा त्यांच्या लोकप्रियतेचे कारण आहे. बुलढाणा नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिला खुला प्रवर्गाची सोडत निघाली आणि पुन्हा एकदा राजकारण्यांच्या नजरा भाईजींकडे वळल्या आहेत. यापूर्वी २००२ मध्ये जनतेमधून नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाईजींच्या अर्धांगिणी सौ. पुष्पाताई चांडक निवडून आल्या होत्या. त्यानंतर भाईजींनी २००४ च्या विधानसभा निवडणूकीत आमदारकी लढविली. परंतु त्यांना अपयश आले. पुढे २०१० मध्ये विधानपरिषदेत भाईजींनी नशीब आजमावले. तिथेही हुलकावणी मिळाली. नंतर मात्र भाईजींनी कुठलीच निवडणूक लढविली नाही. चर्चा मात्र प्रत्येक निवडणूकीच्या वेळी झाली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूकीच्या वेळीही भाईजींना भाजपकडून ‘ऑफर’ होती. त्यांनी नम्रपणे याला नकार दिला. भाईजींच्या जन्मदिनानिमित्त २०१५ मध्ये त्यांची प्रकट मुलाखत झाली होती, या मुलाखतीत त्यांनी जाहीर केले होते की, ते किंवा त्यांच्या परिवारातील कुठलाही सदस्य कुठलीही निवडणूक लढविणार नाही. त्या गोष्टीवर भाईजी आजही ठाम आहेत.

गुड इव्हिनिंग सिटीजवळ यासंदर्भात मत व्यक्त करतांना ते म्हणाले की, ‘नगराध्यक्षपदासाठी कोमलताईंच्या नावाची चर्चा होत आहे. परंतु आम्हांला कुणालाच यात पडायचे नाही.. निवडणूका आता पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत. त्यातच संस्था चालवितांना काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे… राजकारणात आले की, ईच्छा नसतांनाही काहींचे कर्जप्रकरण करावे लागतात.. दूसरीकडे निवडणूक लढली की राजकीय विरोधक तयार होतात.. मग काही कारण नसतांना पतसंस्थेची बदनामी होवू शकते आणि बुलढाणा अर्बनचे अध्यक्षपद हे कुठल्याही राजकीय पदापेक्षा माझ्यासाठी सर्वोच्च आहे कारण या पदामध्ये संचालक, असंख्य सभासद, अनेक हितचिंतकांचा विश्वास सामावलेला आहे’,  या शब्दांत भाईजींनी पतसंस्था सर्वोतोपरी असल्याचे स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, नगराध्यक्षपदावर काम करतांना नगरसेवकांची मर्जी सांभाळावी लागते. आपण भ्रष्टाचारी नसलो की, अनेकांची अडचण होते, त्यामुळे विकासकामांना खिळ घालण्यासाठी भ्रष्टाचारी यंत्रणा तयार राहतात.. म्हणून कुणाशी शत्रुत्वही नको.. निवडणूक लढली नाही की, सगळेच मित्र असतात… त्यामुळेच निवडणूकीच्या मार्गाने आम्ही कुणीच जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत