◾ आकाश दळवी यांचा पक्षातून राजीनामा
बुलढाणा, 18 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : युवानेते आकाश दळवी यांनी शिवसेना सोडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल, शुक्रवारी शिंदे सेनेच्यावतीने तातडीने विदर्भातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले होते. या बैठकीत शिवसेनेचे बुलढाणा शहर कार्याध्यक्ष आकाश दळवी सुद्धा पोहोचले होते. त्यांनी आपला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविला. काँग्रेस सोडून जेमतेम दोन वर्ष आधी आकाश दळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते शिवसैनिक झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रभागामध्ये विविध विकास कामे सुद्धा केली. बुलढाणा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी ते उत्सुक आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची पत्नी नीलम यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प मेळावा आयोजित करून याबाबत घोषणाही केली. बुलढाणा मतदारसंघाचा विचार केला असता आमदार संजय गायकवाड हेच शिवसेनेचे सर्वेसर्वा आहे. मागील काही महिन्यांपासून आकाश दळवी आणि आमदार गायकवाड यांच्यात बराचसा दुरावा निर्माण झालेला दिसून आला आहे. दळवी यांच्या राजीनामा मागे हे सुद्धा कारण असल्याचे बोलले जात आहे. कालच्या मुंबईच्या बैठकीमध्ये खासदार जाधव आणि खासदार श्री शिंदे यांनी दळवी यांच्याशी राजीनामा मागे घेण्याबाबत चर्चा केली. परंतु दळवी आपल्या निर्णयावर ठाम होते. मुंबईहून परतल्यानंतर आकाश दळवी पुढील राजकीय भवितव्याबाबत काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करतात की, इतर पक्षाचे आकाश विस्तारतात, हे पुढे कळेलच. तशीही दिवाळीला सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रवेश, घरवापसी, राजीनामा असे फटाके फुटणारच आहेत.



