spot_img

बापरे! हरभऱ्याच्या कट्ट्यातील 7 तोळे सोने झाले होते गायब !

 

पण धावून आले “गजानन”
बुलढाणा, १८ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : सोन्याचे भावात दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अन् प्रत्येकाला वाटत आहे की, आपल्या जवळ सोनं पाहिजे होतं पण अशातच खामगाव बाजार समितीत हरभर्‍याच्या कट्ट्यात सापडलेलं सात तोळे सोनं त्यांनी परत केल्याची घटना घडली आहे. तांगडे कुटुंबियांकडे सोनं हरविल्यामुळे “गजानन”कडे धावा करावा लागला अन् त्यांच्यासाठी धावून आले गजानन आमले.
शेतकऱ्याचे हरवलेले 7 तोळ्याचे सोने अंदाजे रक्कम आज घडीला 09 लाख रुपयांचे दागिने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शासकीय सचिव गजानन आमले यांच्या मार्गदर्शनाखाली परत केल्याची घटना आज शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे घडली. या कौतुकास्पद कामगिरीमुळे बाजार समितीचे पुन्हा एकदा सर्वत्र कौतुक होत आहे.
विदर्भातील सर्वात मोठी व श्रीमंत बाजार समिती म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सध्या दिवाळी सणोत्सवा दरम्यान जिल्हा व जिल्ह्याबाहेरील गावातून मोठया प्रमाणात मालाची आवक सुरु आहे, त्यातच मेहकर तालुक्यातील कळपीरा येथील शेतकरी जनार्दन दत्ताराव तांगडे वय 52 यांनी शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सावता ट्रेडर्समध्ये 77 कट्टे हरभरा विक्री करिता आणला होता. उपरोक्त हरभराच्या कट्टामध्ये त्यांच्या घरच्यांनी 7 तोळे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते. मात्र याची कोणतीही कल्पना नसाल्याकारणाने शेतकरी बांधव जनार्धन तांगडे यांनी हरभरा विक्रीसाठी आणला व सावता ट्रेडर्स येथे माल विक्रीकरून ते घरी निघून गेले, नंतर त्यांच्या लक्ष्यात आले होते मात्र वेळ निघून गेली होती. त्यातच आज शनिवार पासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सलग 6 दिवस सुट्टी असल्याने डोक्यावर हाथ मारून घेण्याची वेळ दिवाळी सणात सुद्धा त्यांच्या व परिवारावर आली होती. मात्र त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तसेच, माधवराव जाधव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर यांना सदर घटनेची माहिती दिली, यावेळी केंद्रीय मंत्री व सभापती जाधव यांनी भ्रमणध्वनी करून उपरोक्त घटनेची माहिती बुलढाणा येथील सहाय्यक निबंधक तथा खामगाव बाजार समितीचे शासकीय सचिव असलेले गजानन आमले यांना दिली. याप्रसंगी क्षणाचाही विलंब न करता सचिव आमले यांनी एक टीम तयार करून युद्धपातळीवर यंत्रणा राबवली आणि काही वेळेतच त्या शेतकऱ्याचे हरवलेले सोने त्याला परत मिळवून दिले.
यावेळी बाजार समितीचे निरीक्षक विजयबाप्पू इंगळे, पर्यवेक्षक सुधाकर बनसोड यांनी सचिवांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने वरील प्रकरणाची सखोल चौकशी केली व यंत्रणा राबवून शेतकरी तांगडे यांचे हरवलेलं सोने ज्यामध्ये गहू पोथ, एकदानी पोथ, मंगळसूत्र पोथ, कानातील झुमके 2 नग, लहान मुलांच्या गळ्यातील ओम 3 नग, अंगठी, बाजू बंद 2 नग, गळ्यातील मनी 20 नग, लहान मुलांचे हातातील कडे 2 नग, इत्यादी 07 तोळे सोन्याचे दागिने जप्त करून आजरोजी शेतकरी जनार्दन दत्ताराव तांगडे रा. कळपीरा ता.मेहकर यांना खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलावून त्यांचे हरवलेले सोने त्यांच्या स्वाधीन केले.यावेळी दिवाळी सणात परिवारावर आलेले मोठं संकट दूर झाल्यामुळे शेतकरी तांगडे यांनी कृतज्ञता व्यक्त करून शासकीय सचिव व बाजार समितीचे कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी शेतकऱ्यांची आस्था आज सुद्धा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर कायम का आहे याचा नुकनाच प्रत्यय दिसून आला आहे, तसेच यापूर्वी सुद्धा अनेकांचे हरवलेले किंवा चुकून राहिलेले पैसे, साहित्य बाजार समितीच्या वतीने त्यांना परत करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील शेतकरी निसंकोच आपला माल मोठया प्रमाणात खामगाव येथे विक्रीकरिता घेऊन येतात, तरी उपरोक्त कौतुकास्पद घटनेमुळे बाजार समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत