मागे एका लेखात नेपालीयनचं एक छान वक्तव्य वाचनात आलं की, युध्द जिंकण्यासाठी हजारो सैनिक तैनात करण्यापेक्षा एक उत्तम गुप्तहेर तैनात केला तर युध्द होण्याआधीच ते जिंकता येते. अशाप्रकारे गुप्तचर यंत्रणेचं महत्व कितीतरी वर्षापासुन प्रत्येक देशाच्या परराष्ट्र नितीमध्ये गणल्या जातं. भारतातील रॉ ही गुप्तहेर संघटना जीने १९७१ च्या युध्दात एक मोलाची कामगिरी बजावली होती. रॉ ने पाकीस्तानच्या मुख्य परमाणु प्रयोगशाळेचा शोध, पाकीस्तान सरकार आणि त्यांचे सैन्य यातील कॉलव्दारे झालेले संभाषण ट्रॅक केले होते ज्यामुळे युध्दाचा शेवट भारताच्या विजयाने झाला. रॉ बाबत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात नितांत आदर आणि अभिमान आहे. पुर्वी फारशी यांत्रिक साधने उपलब्ध नसतांना त्यांनी केलेल्या मोहिमा कौतुकास पात्र आहेतच. मग सद्यस्थितीत आधुनिक उपकरणांची रेलचेल असतांना गुप्तहेर यंत्रणा अपयशी कशा होतात? याचा शोध घेणे आवश्यक आहे. काल दिल्ली येथे लाल किल्याजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट होऊन १०-१२ व्यक्ती मरण पावल्या. भारताची राजधानी दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडविल्या जातो तरी गुप्तहेर यंत्रणेला माहिती मिळु नये याचे आश्चर्य वाटते. स्फोट घडुन गेलाच आहे आता तो कोणी केला, अतिरेकी कुठुन आले, त्यांना कोणी मदत केली यावर बर्याच पत्रकार परिषद घेतल्या जातील. तपासाची चक्रे फिरुन चोवीस तासात आरोपींना अटक केल्याच्या बातम्या झळकुन वाहवाही देखील मिळविता येईल पण हीच तत्परता आधी दाखवली असती तर स्फोट टाळता आला असता याबाबत मात्र डोळेझाक होईल. पुलवामा टक, पहलगाम हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोट या तीनही घटनांनी गुप्तहेर यंत्रणाची निष्क्रीयता उघडकीस आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुळात गुप्तहेर यंत्रणा देशहितासाठी काम करत आहेत का विरोधी पक्षातील नेत्यांच्या खच्चीकरणासाठी अशा विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतो. बरं गुप्तहेर यंत्रणेला दोष द्यावा तर त्याला हाताळणारे गृहमंत्री वा सध्याचे शासन हयाला निर्दोष म्हणावे का? तसा ही कायम इलेक्शन मोडवर असलेला पक्ष असा प्रश्न कोणी केलाच त्याच उत्तर म्हणुन सत्ताधारी पक्षाचेच नांव घेतल्या जाईल. निवडणुका लढणे, जिंकणे, पक्ष फोडणे, नेहरुंना दोष देणे यापलीकडे देशासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात हे कळायला अजुन किती हल्ले होवु द्यावे लागतील. विरोधी पक्ष सध्याच्या सरकारला दोष देईल, सध्याचे सरकार पुर्वीच्या सरकारच्या काळातही हल्ले झालेच होते असे म्हणुन प्रतिउत्तर देईल, काही दिवस मिडीयाचे कव्हरेज, पेपरचे मधळे भरले जातील आणि परत स्थिती जैसे थे. पुन्हा मग तो निवडणुकांचा प्रचार, ती प्रचाराची राळ, तो देशभक्तीचा आव आणि देशाच्या मिट्टीची, गंगामाईची शपथ वैगेरे वैगेरे. हल्यात बळी गेलेल्या परिवाराला मात्र क्षणापुरती सहानुभती आणि काही लाखांची मदत. आतंकवाद अब और नही सहेंगे अशी भिमगर्जना केल्या जाते व पुन्हा दरवर्षी सहन करावे लागते. पहलगाम हल्ला झाला, त्यावर आपल्या देशाकडुन प्रतिहल्ला होवुन आतंकवाद्याचे तळ उध्वस्त केले. आपणच आपल्या पाठीवर शाबाशीची थाप मारुन घेतली. आपणाकडुन झालेली कार्यवाही झाली कि नाही झाली याबाबत सत्यता विचारण्याचा हेतु नाहीच पण पाकीस्तानच्या खेळाडुंकडुन आंतरराष्ट्रीय मंचावर विमान पाडल्याचे जे देखावे करण्यात आले त्यातुन भारताची स्तुती झाली की नाचक्की याचे उत्तर कोण देईल. बरं कोणी प्रश्न विचारलाच तर त्याला दहशतवादी, आंतकवादी, अर्बन नक्षलवादी म्हणुन हिणवल्या जाते किंवा पाकीस्तानात जावुन रहा असा अनाहुत सल्ला दिला जातो. हल्यांवर प्रतिहल्ला करुन देशप्रेम दाखविण्यापेक्षा हल्लाच होवुच नये अशी परिस्थिती निर्माण करावी हीच रास्तअपेक्षा प्रत्येक भारतीय नागरिकांकडुन व्यक्त केल्या जात आहे. तसेही निवडणुंकाच्या पार्श्वभुमीवर असे हल्ले होतातच कसे हा प्रश्न देखील अनुत्तरीतच राहतो.



