spot_img

खळबजनक ट्विस्ट ः वंचितचा काँग्रेसकडे बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी हट्ट #अमोल हिरोळे यांची सुन वंचितची उमेदवार

बुलढाणा, 16 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असतांना बहुजन आघाडीने काँग्रेसची डोकेदुखी वाढविली आहे. बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी वंचितने हट्ट धरला असून उद्योजक अमोल हिरोळे यांची सुन डॉ. संगीता अर्चित हिरोळे वंचितच्या उमेदवार असणार आहेत. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जर बुलढाणा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवली तर बुलढाण्यात निवडणूकीत मोठे ट्विस्ट पाहायला मिळतील.
एका दिवसापूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि वंचितचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर आघाडीची घोषणा केली. हातात हात घालून एकत्रीत फोटोही झळकले. याला काही तास उलटत नाही तोच आज सकाळनंतर अमोल हिरोळे यांच्या बंगल्यावर हालचाली बघायला मिळाल्या. वंचितच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हिरोळे यांना निवडणूक लढण्यासाठी गळ घातल्याचे समजते. हिरोळे यांचे सुपुत्र डॉ. अर्चित यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी लढविण्यावर यशस्वी चर्चा झाली. त्यानंतर प्रदेश नेते खामगांवचे अशोक सोनोनेंपासून ॲड. प्रकाश आंबेडकरांपर्यंत मोबाईल खणाणले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपर्यंतही हिरोळेंच्या हितचिंतकांनी संदेश पोहोचविले. उच्चविद्याविभूषित डॉ. संगीता प्रभावी उमेदवार ठरू शकतात, हा विश्वास वंचित बहुजन आघाडीला आहे. मागील निवडणूकांमध्ये नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद वंचितच्या तिकीटावर विजयी ठरल्या होत्या. मुस्लिम आणि मागासगर्वीय समाजाची सर्वाधिक मते नजमुन्नीसा यांना मिळाली होती. हिरोळे यांचा समाजातील विविध वर्गामध्ये नावलौकिक आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रातील आणि जाती-धर्मातील लोकांशी स्नेहबंध आहेत. त्यामुळे दलीत समाजासह इतरही समाज आपल्यासोबत राहील, ही धारणा अमोल हिरोळे यांची आहे. त्यामुळे ते आपल्या सुनेला नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरविण्यासाठी पूर्ण तयारी करून आहेत. नगराध्यक्षपदासाठी हिरोळे यांच्या प्रबळ दावेदारी मागे त्यांची आर्थिक सुबत्ता, हे सुद्धा एक कारण आहे. डॉ. संगीता हिरोळे यांचा उमेदवारी अर्ज तयार आहे. अमोल हिरोळे यांच्या बंगल्यावर गर्दी वाढली आहे, हे तेव्हढंच खरे आहे. उद्या वंचितकडून त्यांची उमेदवारी दाखल केली जाणार, हे निश्चीत आहे. आता काँग्रेस वंचितला थांबविते की, आपले समर्थन देते की, आघाडी तोडते, हे उद्यापर्यंत कळेलच.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत