बुलढाणा, 20 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत पुन्हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. चौरंगी होणारी निवडणूकीने आता तिरंगी वळण घेतले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. संगीता अर्चित हिरोळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मागील दोन दिवसांपासून प्रचंड घडामोडी घडाल्याने हा परिणाम समोर आल्याचे गुड इव्हिनिंग सिटीला कळत आहे. मागील वेळेस वंचितचा उमेदवार बुलढाणा नगराध्यक्षपदी विजयी झालेला होता. त्यामुळे याठिकाणी वंचितलाच कॉंग्रेसच्या युतीसह उमेदवारी मिळावी, असा आग्रह वंचितचा होता. परंतु कॉंग्रेसने बुलढाण्याची जागा वंचितला सोडण्यास ठाम नकार दिल्यानंतर एकाकी पडलेल्या वंचितने निवडणूकीतून माघार घेण्याचे ठरविले. उद्योजक अमोल हिरोळे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली होती. याचे कारण म्हणजे त्यांचे सर्वधर्मीयांमध्ये असलेले सलोख्याचे संबंध ! हिरोळे पेट्रोलियम आणि हिरोळे इण्डेन गॅस एजन्सीच्या माध्यमातून हिराळे यांचे नांव आधीच घराघरात पोहोचलेले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची धास्ती इतर उमेदवारांनी, खास करून कॉंग्रेसने घेतली होती. आर्थिकदृष्ट्या सधन-संपन्न असलेल्या हिरोळे निवडणूकीची दिशा बदलण्यासाठी सक्षम होते. परंतु आज, त्यांनी दुपारी १२ वाजेदरम्यान आपल्या सुनबाईंचा अर्ज विड्रॉल केला. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी श्रद्धेय आहे. त्यांनी माझ्यासारख्या अराजकीय माणसांवर विश्वास ठेवून मला जी संधी दिली, ती मी आजन्म विसरू शकत नाही. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून समाजातील विविध स्तरांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया माझ्याकडे येत होत्या. त्यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक होत्या. कॉंग्रेस पक्षाची साथ न मिळाल्यामुळे आमची बाजू कमकुवत होती. याउपरही प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती पण अप्रिय निर्णय समोर आला असता तर आयुष्यभराच्या प्रतिष्ठेला आणि नांवाला गालबोट लागले असते. दूसरी बाब म्हणजे निवडणूक लढविणे म्हणजे अनेकांशी शत्रुत्व निर्माण करणे आहे. सत्त्तेच्या समीकरणात बेरजेपक्षा वजाबाकीचे गणित समोर येत असल्याचे अनेक शुभचिंतकांनी तसेच मित्रपरिवारानेही सांगितले. श्री हिरोळे पुढे म्हणाले की, इतर समाजात असलेल्या माझ्या मित्रमंडळींनी, ज्यांना मी मानतो, अशांनी ‘या भानगडीत न पडण्याचा प्रामाणिक सल्ला दिला. याशिवाय ज्यांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे, असे एक नेते आणि एक अत्यंत निकटवर्तीय मित्र दोघांनी राजकारणापासून परावृत्त राहण्याची सूचना केल्यामुळे मी माघार घेतली, असे प्रामाणिक मत हिरोळे यांनी गुड इव्हिनिंग सिटीकडे व्यक्त केले. शेवटी त्यांनी सांगितले की, आजपर्यंत जी समाजसेवा मी करीत आलो आहे, त्यात खंड पडणार नाही… सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवून जनसेवा सुरुच ठेवेल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.



