बुलढाणा, २1 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः शेतात नाला नको आणि घरात साला नको, अशी प्रचलित म्हण आहे. परंतु जर दाजीच साळ्याकडे (श्यालक किंवा मेहुणा) राहत असेल तर ! बायकोच्या माहेरी जास्त दिवस राहणार्या जावयाची किंमत कमी कमी होत जाते, हे सामाजिक सत्य आहे. येथील चंद्रमणी नगरमध्ये १५ वर्षांपासून आपल्या साळ्याकडे राहणार्या दाजीला मार खावा लागल्याची घटना सोमवारी घडली. सदर प्रकरणात मारहाण करणार्या साळ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, येथील चंद्रमणी नगरमध्ये साहेबराव भिमराव गवई (वय ३९) मागील १५ वर्षांपासून पत्नी आणि त्यांच्या परिवारासह साळ्याकडे राहतात. साहेबराव मजूरी करतात. घटनेच्या दिवशी रात्री ८ वाजेदरम्यान साळा बंटी उत्तम वानखेडे दारू पिलेला होता. त्याने घरात बसलेल्या आपल्या दाजी साहेबरावाला म्हटले की, ‘तू किती दिवस माझे घरी राहुन खातो’, यावर साहेबरावानी उत्तर दिले की, ‘मला तुझ्या घरी राहण्याचा शोक नाही. तुझ्या बहिणीमुळे मला इथे राहावे लागते’. याने चिडून जावून बंटीने कुठलाही विचार न करता लाकडी काठी घेतली आणि साहेबरावाच्या डोक्यात हाणली. नंतर त्याने मारहाणीलाही सुरुवात केली. त्याच्या तावडीतून त्याचीच बहीण, म्हणजे साहेबरावांना त्यांच्या पत्नीने सोडविले. पोलिसांनी तक्रारीवरून बंटी वानखेडेच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २००३ कलम ११८ नुसार गुन्हा नोंदविला आहे. तपास हेकॉं गजानन जाधव करीत आहेत.



