चुक कोणाची मानवी ? की तांत्रिक ?
बुलढाणा 28 मे, (गुड इव्हिंनग सिटी) : मागील महिन्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले होते. तब्बल 32 दिवसानंतर जळगाव जामोद मतदार संघातील मारोड मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची गडबड समोर आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या मतदान केंद्रावर एकूण मतदानात 50 जणांचे अधिकचे मतदान समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले आहे. हे मतदान कोणी केले ? अशी शंका उपस्थित होत आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी 4 जूनला होणार्या मतमोजणी संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सूचना आणि माहिती देण्याबाबत पाचरण केले त्यावेळी या मारोड मतदान केंद्रासंदर्भात घडलेली बाब राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली आहे. मतदानकेंद्रावर सकाळी 7 वाजेच्या आधी ईव्हीएम सेट करून मॉक पोलचे 50 मतदान घ्यावे लागतात. त्यानंतर ते क्लिअर करून ईव्हीएम ची आकडेवारी शुन्य करावी लागते. परंतु मारोड केंद्रावर मॉक पोलचे ते मतदान क्लिअर न करता मूळ मतदानात समाविष्ट करण्यात आले आहे. 4 जुनला संपूर्ण मतदान मोजणीची प्रकिया झाल्यानंतरच सर्वात शेवटी मारोड येथील मतांची गणना होणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिली आहे. याआधी नागपूर मध्ये ही अशा प्रकारची घटना घडल्यच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. शासनाकडून अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले असताना असे प्रकार घडणे योग्य नाही.