खड्डे रूपी तलावापासून प्रवाशांना मिळणार दिलासा

बुलढाणा, २२ मे (गुड इव्हिनिंग सिटी / अजय काकडे) : बसस्थानकाची दुरवस्था, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असे आपण अनेकवेळा ऐकत असतो. पण आता बुलढाणा बसस्थानकाच्या परिसरात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सध्या त्याठिकाणी खोदकाम करून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. बुलढाणा बसस्थानकात प्रवेश करीत असतांना सर्वात मोठा खड्डा त्या ठिकाणी आहे. पावसाळयामध्ये व इतरवेळी पाऊस पडल्या नंतर हा खड्डा तलावाचे रूप धारण करतो. यामुळे ये जा करणाऱ्या गाड्या त्यामधून जात असतांना उभे असणाऱ्या प्रवशांच्या अंगावर चिखल उडत असतो. तसेच त्याठिकाणाहून बसस्थानकात जात असतांना प्रवशांना कसरत करावी लागते. जेष्ठ व्यक्ती किंवा गर्भवती महिला यांना बसस्थानकात जाण्यासाठी मोठं संकटच त्यांच्या समोर उभं राहते. बसस्थानकात दररोज शाळा-महाविद्यालय व दैनदिन कामानिमित ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असून, दिवसभर वर्दळ सुरू असते. पण आता या बसस्थनकाचे रूपडं पालटणार आहे. बुलढाणा बसस्थानकासाठी ४ कोटी १३ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम सुरू ही झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सदर काम सुरू आहे. अजयदीप कंस्ट्रक्शन कंपनी हे काम करीत आहे. येणाऱ्या पाच महिन्यात सदर काम पूर्णत्वास जाईल अशी माहिती गुड इव्हिनिंग सिटीला एस टी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.