आशिषबाबा खरात म्हणतात मी महाविकास आघाडी सोबतच
बुलढाणा, 26 ऑक्टोबर (गुड इव्हनिंग सिटी) ः फोडतोड आणि जोडजोडशिवाय राजकारण नाही.. निवडणूकांमध्ये हेच महत्वाचं आहे. यंदाची विधानसभा आयपीएलसारखी वाटतेय. कोण कोणाकडून खेळत आहे, कळतंच नाही. दोन दिवसांपूर्वी सम्राट संघटनेचे संस्थापक आशिषबाबा खरात आमदार संजय गायकवाड शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेणार होते. त्यांनीच आज आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवरून महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई शेळके यांचा प्रचार करणार असल्याचे घोषित केले. आ. गायकवाड यांच्या ‘मातोश्री’ जनसंपर्क कार्यालयावर प्रवेशासाठी जाण्यापूर्वी अॅड. जयश्रीताईंनी खरात यांची भेट घेतल्यानंतर हा प्रवेश रद्द झाल्याचे समजते. आशिषबाबा खरात यांनी लिहीले की, ‘आ. गायकवाड त्यांचे बालमित्र आहेत. परंतु त्यांच्याशी वैचारिक तात्विक मतभेदामुळे कटूता निर्माण झाली होती. परंतु त्यांनी स्वतः येवून भेट घेतली.. त्याचा मला आनंद झाला.. आम्ही मतभेद विसरलो.. आणि त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल शुभेच्छा दिल्या. भीम आर्मीचे सतीश पवारही भेटून गेले. त्यांचेही मी स्वागत केले. मी ज्या राजकीय पक्षात काम करतो, त्याने जयश्रीताईंना तिकीट दिले. मी जालींधरभाऊ बुधवत यांचा प्रचार प्रसार केला. पण जयश्रीताईंना तिकीट दिल्यामुळे मला दुःख झाले. मात्र जयश्रीताई आणि सुनिल शेळके यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी चळवळ जीवंत ठेवण्याचे काम केले. अनेक जनहितार्थ आंदोलनात आम्ही सोबत होतो. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हजारो गोरगरीब महिलांना रोजगार मिळवून दिला. महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून तसेच समाजहितार्थ जयश्रीताईंसोबतच काम करणार, असा निर्णय मी जाहीर करीत आहे’, या शब्दांत त्यांनी सोशल मिडीयावर सदर माहिती प्रसारित केली आहे. विशेष म्हणजे जयश्रीताई शेळके यांच्या स्वागताचा फोटोही त्यांनी या पोस्टसोबत जोडला आहे.
निर्भीड, रोखठोक स्वभावाचे आशिषबाबा खरात हे हजारो युवकांचा सहभाग असलेल्या सम्राट संघटनेचे संस्थापक असून अनेक सामाजिक चळवळी राबविल्यामुळे त्यांचे जिल्हाभरात वेगळे वलय आहे.