बुलढाणा, 1 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः यथेच्छ मद्यप्राशन केल्यानंतर विवेक हरवितो. त्यातच जर वासना उफाळली तर नात्यांचे धागे तोडतांना कुठलाच विचार हैवान झालेली ती व्यक्ती करीत नाही. एका मजुराने आपल्याच सहकाऱ्याच्या 5 वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनविल्याची हादरवणारी घटना हातेडी परिसरात घडली. याप्रकरणातील आरोपी पळून जात असतांना ग्रामिण पोलिसांनी चपळता दाखवित मलकापूर रेल्वे स्टेशनवर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार हातेडी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ईमारतीचे बांधकाम सुरु आहे. या परिसरात उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश अशा भागातून आलेले मजूर काम करीत आहेत. यातील बहुतांश मजूर त्याच ठिकाणी खोल्या काढून मुक्कामी आहेत. 28 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान संतोष ब्रिजपाल भुझ्या (वय 25) दारू पिवून आला. त्याने एका खोलीत प्रवेश केला. आत 5 वर्षीय बालिका एकटीच होती. तिचे आई-वडील कामावर होते. भुझ्याने कुठलाच विचार न करता या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तो पळून गेला. घरी परतल्यावर ही बाब बालिकेच्या आई-वडीलांच्या लक्षात आली. त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार गजानन कांबळे यांनी तत्काळ आरोपी भुझ्याला पकडण्यासाठी पथक रवाना केले. मलकापूर स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या विरोधात कलम 65 (2), 137 (2) बीएनएस सहकलम 4 (2), 5 (एम), 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय शरद माळी करीत आहेत.
दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून हातेडी हादरली आहे.





Total Users : 1353523