◾ महामानव ग्रुपकडून तिव्र आक्षेप
बुलढाणा :
सामन्य रुग्णालय बुलढाणा येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात रुग्णांच्या विविध मागण्या आणि तक्रारींच्या अनुषंगाने ‘महामानव ग्रुप’च्या शेकडो सदस्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना धडक लेखी निवेदन देण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील संभाव्य प्रशासकीय अनियमितता, कर्तव्यपालनातील निष्काळजीपणा, आणि रुग्णांना रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देण्यातील विलंब याविरोधात आक्रमक भूमिका घेत महामानव ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त मिळावे व अनेकांचे प्राण वाचावे, या उदात्त हेतूने ‘महामानव ग्रुप’ गेल्या १४ वर्षांपासून जिल्ह्यात सतत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना वर्षभर रक्त पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण वाचले असून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. परंतु, काही निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे अनेक गरीब रुग्ण रक्ताअभावी उपचाराविना परत जात असल्याचे महामानव ग्रुपच्या निदर्शनास आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने महामानव ग्रुपच्या वतीने कार्यालयाला घेराव घालून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांना पदमुक्त करण्याची मागणी लावून धरली. आंदोलनादरम्यान महामानव ग्रुपचे अध्यक्ष सुमित गायकवाड यांनी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कविता पवार या शासकीय सेवेत असताना स्वतःची खासगी पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्याचे कागदोपत्री पुरावे जिल्हा शल्य चिकित्सकांसमोर सिद्ध केले.
शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना खासगी व्यवसाय किंवा सेवा देण्याची परवानगी नसते. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे खासगी व्यवसाय करणाऱ्या या अधिकाऱ्यांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नसल्याचा आरोप सुमितभाऊ गायकवाड यांनी पुराव्यानिशी केला. या मुद्याची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने पावले उचलली. संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या दिशेने अनुभवी डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठण करण्यात आले असून, याबाबतचे निर्देश व कारवाईची माहिती महामानव ग्रुपचे अध्यक्ष सुमित गायकवाड यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. गोरगरिबांचे शोषण करू बघणाऱ्या इतर मोठ्या माशांनाही लवकरच पुराव्यानिशी समोर आणून कायद्याचा दणका दिल्याशिवाय महामानव ग्रुप शांत बसणार नाही, अशी ठाम ग्वाही यावेळी अध्यक्ष सुमित गायकवाड यांनी दिली. यावेळी महामानव ग्रुपचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 1445373