बुलढाणा, 30 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार अशा बातम्या आज सकाळपासून सुरू आहे. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने आमदार संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारची पक्षाकडून कुठलीच निलंबनाची कारवाई व वरिष्ठांकडून सुचना प्राप्त झाल्या नाहीत. निलंबनाबाबतच्या वृत्ताचे आमदार संजय गायकवाड यांनी खंडन केले आहे. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत. या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांच्या निलंबनाचा आदेश दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत होते. शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची चर्चा राज्यभर पसरली होती. परंतु अजून पक्षाकडून कुठलेही आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे या हवेतील चर्चा असल्याचे तुर्तास तरी दिसून येते.





Total Users : 1440757