बुलढाणा: 30 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी): शेतकरी आत्महत्यांवरून केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून चौफेर कोंडी झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले. मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोललोच नव्हतो, तर नशेच्या आहारी जाऊन आणि प्रेमभंगामुळे स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येबाबत मी उद्विग्नतेने बोललो होतो. तरीही माझ्या शब्दांमुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मन दुखावले असेल, तर मी अत्यंत विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असा खुलासा आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
दरम्यान, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तुमच्या संभाव्य निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे का आणि तुमच्यावर कठोर कारवाई होणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी विचारला असता गायकवाड यांनी त्यावर केवळ “नो कॉमेंट्स” म्हणत अधिक भाष्य करणे पूर्णपणे टाळले.
शेतकऱ्यांसाठी स्वतःचे प्लॉट विकले, मी स्वतःची शेतकरी पार्श्वभूमी सांगत गायकवाड यांनी आपल्या कामांचा पाढा वाचला. “गेल्या 40 ते 42 वर्षांपासून मी शेतकरी म्हणून आणि शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे. माझे वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मी जवळून पाहिले आहे.”
“शेतकऱ्यांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आणि संवेदनशीलता आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी माझे स्वतःचे वैयक्तिक प्लॉट विकले आहेत. कोणाचे शेत जळाले तर त्याला आर्थिक मदत केली, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना 6-6 महिने पुरेल इतका किराणा भरून दिला आणि तब्बल 55 शेतकऱ्यांना स्वतः पक्की घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे मी अन्नदात्याच्या विरोधात बोलेन, हा विचारही मनात येऊ शकत नाही.”
वादग्रस्त विधानामागचा घटनाक्रम सांगताना आमदार म्हणाले, “अवघ्या 8 ते 10 दिवसांपूर्वी माझ्याच जवळच्या कुटुंबातील एका तरुणाने आत्महत्या केली. आजकालची तरुण पिढी गांजा, चरस अशा विविध प्रकारच्या नशेत बेभान होते किंवा प्रेमभंगाच्या नैराश्यातून आई-वडील, पत्नी आणि लहान मुलांचा विचार न करता जीवन संपवते. अशा वेळी त्या कुटुंबाची जी भयावह अवस्था होते, त्या संतापातून आणि काळजीपोटी मी तरुणांना उद्देशून बोललो होतो.”
विपर्यास करून बदनामीचा डाव
“माझ्या या विधानाचा संबंध शेतकऱ्यांशी जोडून त्याचा विपर्यास करण्यात आला. मी शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका असे कधीही बोललेलो नाही. परंतु, जर या विपर्यासामुळे महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याला अथवा पक्षाला यातना झाल्या असतील, तर मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करून हात जोडून माफी मागतो.”
निलंबनाची कारवाई होणार का?; गायकवाड म्हणाले— नो कॉमेंट्स!
पत्रकार परिषदेत कारवाईच्या मुद्द्यावरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. ‘शेतकरीविरोधी विधानामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याने एकनाथ शिंदे यांनी तुमच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत का?’ असा थेट प्रश्न विचारताच आमदार गायकवाड निरुत्तर झाले. त्यांनी “या विषयावर मला काही बोलायचे नाही, नो कॉमेंट्स” असे सांगत हात जोडले आणि विषय तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला.





Total Users : 1440760