माळविहीरमध्ये कचर्याचा डोंगर नको.. जिजाऊंचे स्मारक उभारा
बुलढाणा, 25 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) :
बुलढाणा शहरालगतच्या माळविहीर ई-क्लास परिसरातील प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्पाविरोधात नागरिकांचा संताप अनावर झाला असून, सुंदरखेड येथील जुनागाव परिसरातील हनुमान मंदिराजवळ कचरा डेपोरूपी रावणाचे प्रतीकात्मक दहन करून नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध नोंदविला आहे. सावळा–सुंदरखेड–माळविहीर परिसर कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात सावळा, सुंदरखेड, माळविहीर, भादोला व पोखरी परिसरातील सर्व जाती-धर्मांतील महिला, पुरुष, युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनातून नागरिकांनी आपली प्रमुख मागणी स्पष्ट केली की, माळविहीर ई-क्लास परिसरातील प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रमाता जिजाऊंचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखण्यासाठी संबंधित जागेवर राष्ट्रमाता जिजाऊंचे भव्य स्मारक, प्रेरणास्थळ, अभ्यासिका, ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्र आणि सार्वजनिक उद्यान उभारण्यात यावे, अशी विशेष मागणी करण्यात आली. ज्या जिल्ह्याला राष्ट्रमाता जिजाऊंचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्या जिल्ह्याची ओळख कचऱ्याच्या डोंगरांनी नव्हे, तर जिजाऊंच्या भव्य स्मारकाने झाली पाहिजे. आमच्या परिसराला कचरा डेपोचा कलंक नको, जिजाऊंच्या विचारांचा अभिमान हवा! अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. बुलढाणा शहरालगतचा खामगाव रोड परिसर हा वाढत्या लोकवस्तीचा आणि भविष्यातील नागरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी शाळा, महाविद्यालये, आरोग्य सुविधा, क्रीडांगणे, उद्याने आणि इतर सार्वजनिक विकास प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. आमच्या मुलांच्या हातात पुस्तके हवीत, कचऱ्याचे ढीग नकोत. आम्हाला शाळा, महाविद्यालये आणि विकासाच्या सुविधा हव्या आहेत. आमच्या पुढील पिढ्यांच्या भविष्याशी तडजोड करणारा कचरा डेपो आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे चार वेळा शांततेच्या व लोकशाही मार्गाने निवेदने सादर करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून नागरिकांनी आपला विरोध नोंदविला. यापूर्वी प्रशासनाकडून सात दिवसांच्या आत संबंधित अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप प्रकल्प रद्द करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय नागरिकांना कळविण्यात आलेला नाही. चार वेळा निवेदने देऊनही आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात आहे का? प्रशासनाने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. आम्हाला केवळ आश्वासने नकोत, कचरा डेपो रद्द करण्याचा लेखी आदेश हवा!” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रस्तावित कचरा डेपोमुळे दुर्गंधी, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ, अपघातांचा धोका आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. आम्हाला स्वच्छ हवा, सुरक्षित पाणी, निरोगी जीवन आणि आमच्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्य हवे आहे. आमच्या गावांच्या नावासमोर कचरा डेपोचा कायमस्वरूपी कलंक आम्हाला मान्य नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. या आंदोलनात सर्व जाती-धर्मांतील महिला, पुरुष, युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन लढा दिला. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्याचे आंदोलनादरम्यान सांगण्यात आले. हा इशारा अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनातून नागरिकांनी माळविहीर ई-क्लास परिसरातील प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करणे, त्या जागेवर राष्ट्रमाता जिजाऊंचे भव्य स्मारक उभारणे आणि परिसरात शैक्षणिक, आरोग्यविषयक व सार्वजनिक विकास प्रकल्प राबविण या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. आम्हाला दुर्गंधी नको, विकास हवा. आम्हाला कचरा डेपो नको, राष्ट्रमाता जिजाऊंचे भव्य स्मारक हवे! असा ठाम निर्धार व्यक्त करत प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्प कायमस्वरूपी रद्द होईपर्यंत लोकशाही व शांततामय मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका संघर्ष समितीने मांडली.





Total Users : 1437440