चक्क पदमश्री हिम्मतराव बावस्कर यांची फसवणूक
बुलढाणा : २२ ऑक्टोबर ( गुड इव्हीनींग सिटी ): वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने २०२२ मध्ये ज्यांना ‘पदमश्री’ पुरस्काराने सन्मानित केले, त्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना कृषी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आणि अनास्थेमुळे गेल्या सहा वर्षांपासून प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथून खरेदी केलेली ६०० पेरूची कलमे पूर्णपणे सदोष निघाल्याने आणि वारंवार उपाययोजना करूनही फळधारणा होत नसल्याने, डॉ. बावस्कर यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी आपल्या शेतात एकूण ११०० पेरूच्या कलमांची लागवड केली होती. यापैकी ५०० कलमे शासकीय फळ रोपवाटिका, बुलढाणा येथून घेतली होती. ६०० कलमे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथून घेतली होती.
एकाच शेतात, एकाच प्रकारची माती, समान हवामान, समान खते, छाटणी व पाण्याचा ताण देण्याची एकच पद्धत असताना शासकीय रोपवाटिकेच्या ५०० झाडांना गेल्या दोन वर्षांपासून उत्तम फळधारणा होत आहे. मात्र, KVK बुलढाणा कडून घेतलेल्या ६०० कलमांना एकही फळ लागलेले नाही. तक्रारीनंतर ७ एप्रिल २०२५ रोजी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राऊत, KVK बुलढाणाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. झापे आणि डॉ. अनिल तारू यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. तब्बल ४३ दिवसांनी आलेल्या अहवालात KVK च्या झाडांचे गुणधर्म ‘L-49’ या जातीशी जुळत नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. तरीही KVK कडून पाण्याचा ताण व छाटणी योग्य नसल्याचा अजब निष्कर्ष काढून वेळ मारून नेण्यात आली.
त्यानंतर शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण ११०० झाडांची शास्त्रोक्त छाटणी, खते आणि संजीवकांचा वापर करण्यात आला. ऑगस्ट २०२५ रोजी शासकीय रोपवाटिकेच्या ५०० झाडांना पुन्हा उत्तम फळे आली, पण KVK च्या ६०० झाडांना फळे आलीच नाहीत. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी तपासणी पथकाने पुन्हा पाहणी केली, मात्र पुढील ६ महिने कोणताही अहवाल दिला नाही एप्रिल ते जुलै २०२६ ला डॉ. अनिल तारू (वरिष्ठ शास्त्रज्ञ, KVK) यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा विविध उपाययोजना करण्यात आल्या. २४ एप्रिल २०२६ च्या चुकीच्या सल्ल्याचा फटका शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार पाण्याचा अतिरिक्त ताण दिल्याने फळे देणाऱ्या ५०० झाडांपैकी १०० झाडे मरून वाळली, ज्यामुळे बावस्कर यांचे अतिरिक्त नुकसान झाले. २१ ऑगस्ट रोजी डॉ. झापे आणि डॉ. अनिल तारू यांनी पुन्हा शेताची पाहणी केली असता, शासकीय रोपवाटिकेची झाडे फळांनी बहरलेली तर KVK ची ६०० झाडे पूर्णपणे वांझ असल्याचे स्पष्ट दिसून आले. आपली व्यथा मांडताना पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर म्हणाले, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माझ्यासारख्या व्यक्तीची जर शासकीय व्यवस्थेत अशी अवहेलना आणि फसवणूक होत असेल, तर राज्यातील सर्वसामान्य, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील? जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची KVK सारख्या विश्वासार्ह संस्थेकडून फसवणूक होते आणि विद्यापीठाचे कुलगुरू व कृषी विभाग दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, ही अतिशय खेदजनक बाब आहे. ५ लाख रुपये प्रतिवर्ष नुकसान भरपाई: २०२० ते २०२६ या काळात झालेले प्रचंड आर्थिक नुकसान आणि पुढील १५-२० वर्षांचे होणारे उत्पन्न लक्षात घेता दरवर्षी ५ लाख रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. KVK ची ६०० निष्फळ झाडे उपटून फेकून देऊन तिथे नवीन झाडे लावण्याची तातडीने परवानगी द्यावी. KVK बुलढाणा, अकोला कृषी विद्यापीठाचे संबंधित अधिकारी व शास्त्रज्ञ यांच्यावर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
१५ दिवसांत यावर योग्य कारवाई न झाल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा डॉ. बावस्कर यांनी शासनाला दिला आहे.