बुलढाणा नगर परिषदेचा मोठा निर्णय
बुलढाणा : 19 ऑक्टोबर ( गुड इव्हीनींग सिटी ) : चालू वर्षी झालेल्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे येळगाव धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटला आहे. भविष्यात बुलढाणा शहरात उद्भवू शकणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा नगर परिषदेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येळगाव धरणातून पाणी उपसा करणाऱ्या परिसरातील विविध ग्रामपंचायतींना पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. नगर परिषद कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या शासकीय पत्रात नमूद आहे की, पांगरी, साखळी बु., नांद्राकोळी, खुपगाव, बिरसिंगपूर, डोंगरखंडाळा, हतेडी, सव, अजिजपूर, कोलवड, दत्तपूर/अफजलपूर वाडी, देऊळघाट, उमाळा, केळवड, शिरपूर, जयसिंगपूर, केसापूर आणि अंत्रीतेली या गावांच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. येळगाव धरणातील पाणी प्रमुख्याने बुलढाणा शहरासाठी आरक्षित आहे. यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाजवळ विहीर किंवा बोअरवेल घेऊन नगर परिषदेसोबत करारनामा केला होता. सदर करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार, भविष्यात शहरास पाणीटंचाई उद्भवल्यास या विहिरी आणि पाईपलाईनवरून होणारा पाणीपुरवठा बंद करून बुलढाणा शहरास प्राधान्याने पाणीपुरवठा केला जाईल, असा स्पष्ट उल्लेख आहे. धरणातील कमी झालेला पाणीसाठा आणि बुलढाणा शहराची भविष्यातील गरज विचारात घेता, सर्व संबंधित ग्रामपंचायतींनी येळगाव धरणातून होणारा पाणी उपसा तात्काळ बंद करावा. तसेच आपापल्या गावासाठी पर्यायी पाणी स्रोतांचा शोध घेऊन त्याद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिले आहेत.