बुलढाणा सायबर पोलिसांची कारवाई
बुलढाणा :24 ऑक्टोबर ( गुड इव्हीनींग सिटी ):
खामगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २ कोटी रुपयांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा यांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे आणि त्यांच्या टीमने कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान सायबर पोलिसांच्या पथकाने १४ ऑक्टोबर रोजी नारायणगाव, पुणे येथून आरोपी महेश कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्या खात्यावर फसवणुकीतील २५ लाख रुपये वर्ग झाले होते. महेश कांबळे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १९ ऑक्टोबर रोजी सायबर पथकाने कोलकात्यातील विमानतळ रस्त्यावरील ‘हॉटेल रॉयल रीजन्सी’ येथे सापळा रचून ऑपरेशन राबवले. तेथे सायबर गुन्ह्यासाठी बँक खाती ऑपरेट करताना आरोपी बिकरम विजय सरकार आणि आफताब आलम अली अकबर रा. कोलकाता यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सायबर पोलिसांनी आतापर्यंत या कारवाईमध्ये खालील रक्कम आणि मुद्देमाल जप्त गोठवला (Freeze) आहे. NCCRP पोर्टलवर गोठवलेली रक्कम ४४ लाख रुपये,
महेश कांबळे याच्या खात्यातील रक्कम १ लाख ४० हजार रुपये, जप्त केलेले मोबाईल फोन ३७ हजार रुपये किमतीचे, एकूण रक्कम ४५ लाख ७७ हजार रुपये जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना खामगाव येथील माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. आरोपींकडून प्राप्त माहितीच्या आधारे या तपासाची मुख्य सूत्रे कोलकाता येथे असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकाचे गेलेले २ कोटी रुपये परत मिळवण्यासाठी बुलढाणा सायबर पोलीस जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या आदेशाने एएसआय शकील खान, हेकाँ. राजदीप वानखडे, हेकाँ. विक्की खरात, हेकाँ. राजू आडवे, पोकाँ. कैलास ठोंबरे, पोकाँ. क्षितिज तायडे, पोकाँ. शुभम बोराडे, पोकाँ. पुरुषोत्तम साळवे आणि पोकाँ. ऋषिकेश खंडारे यांच्या पथकाने केली आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड, आणि शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारचा कोणताही सायबर फ्रॉड झाल्यास नागरिकांनी तात्काळ NCCRP पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाईन नंबरवर आपली तक्रार नोंदवावी.





Total Users : 1436217