◾ खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कुणाला केला फोन??
◾ जयंत पाटील, रोहित पवार यांची भूमिका काय??
बुलढाणा, 29 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल कोल्हे यांच्यावरील हल्ला प्रकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गांभीर्याने घेण्यात आले असून खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच आ. रोहीत पवार या तिघांनीही सदर प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे सुप्रियाताई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री पानसरे यांना थेट कॉल केल्याचे समजते तर जयंत पाटील यांनी सुनिल कोल्हे यांना संपर्क साधून तब्येतीची विचारपूस करीत त्यांना धीर दिला आहे. ‘कारवाई होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही’, अशी भूमिका जयंत पाटील यांची असल्याचे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी सांगितले. मागील 25 नोव्हेंबर रोजी सुनिल कोल्हे यांच्यावर तालखेडजवळ जीवघेणा हल्ला झाला होता. तोंड बांधून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा एक हात आणि दोन पाय फ्रॅक्चर केले होते. सदर प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. परंतु कुणालाही अटक नाही. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई खेडेकर व कार्यध्यक्ष नरेश शेळके यांनी सदर प्रकरणाला घेवून खा. सुप्रियाताई सुळे आणि जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना सविस्तार माहिती दिली. त्यानंतर सुप्रियाताईंनी जखमी असलेल्या कोल्हेंसोबत मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. प्रकरणाची माहिती घेऊन सुप्रियाताईंनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना कारवाईबाबत विचारणा केली असल्याचे कळते. इकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आ. रोहीत पवार यांनीही कोल्हेंसोबत बोलून कारवाईची जोरदार मागणी करणार असल्याचे आश्वस्त केले. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ. रेखाताई यांनी हॉस्पीटलमध्ये जावून सुनिल कोल्हे यांची भेट घेतली. आज, नरेश शेळके यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बी.टी. जाधव, पी.एम. जाधव, बुलढाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर, प्रभाकर काळवाघे यांच्यासह सुनिल कोल्हे यांची भेट घेतली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही कोल्हे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी असल्याचे सांगितले आहे.