बुलढाणा, 11फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : अखंड विश्वाच्या शौर्याचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शुक्रवार, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आपल्या विनोदी शैलीने प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील गाजलेले प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या जाहीर शिवकीर्तनाने शिवजयंती उत्सवाला सुरूवात होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने बुलढाणा शहरात प्रथमच महाराष्ट्रातील गाजलेले विनोदी कीर्तनकार हभप. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर शिवकीर्तन शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत शिवनेरी जिजामाता प्रेक्षागार परिसर, आयडीबीआय बँक चौक बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिवकीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, हे विनम्र शिवआवाहन आम्ही शिवप्रेमी समस्त बुलढाणेकर व आयोजक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.