◾विजय अंभोरे पण प्रवेशाच्या यादीत
◾आ. गायकवाड यांच्याकडून कांग्रेसला सुरुंग
बुलढाणा, 6 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) :
हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले पण त्यांच्या निवडीचे काही स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून स्वागत तर झालेच नाही परंतु काँग्रेस सोडून या नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे. आज घाटाखालील काँग्रेसचे युवा नेते अॅड.गणेश सिंग राजपूत आपले बंधू अॅड.विजयसिंग आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. विजय अंभोरे यांनी मागील आठवड्यातच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याचे कळते. काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटात जात असलेल्या या सर्व प्रवेशार्थींना आज संध्याकाळी 7 वाजताची वेळ मिळाली आहे. या सर्व घडामोडी मागे निश्चितच आमदार संजय गायकवाड यांची राजकीय रणनीती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बुलढाणा मतदारसंघात आमदार गायकवाड यांनी काँग्रेसलाच सुरुंग लावायला सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
मोताळा तालुक्यातील काँग्रेसशी एकनिष्ठ म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे मुखत्यारसिंग राजपूत बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद त्यांनी भुषविले आहे. त्याचप्रमाणे त्यांना 2004 मध्ये काँग्रेसकडून बुलढाणा विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. या निवडणूकीत विजयराज शिंदे यांच्याकडून 14 हजार 638 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची मुले यामध्ये अॅड.गणेशसिंग राजपूत व विजयसिंग राजपूत हे राजकारणात पुढे आली. अॅड.गणेशसिंग राजपूत यांना मोताळा तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदच्या सदस्य राहिल्या आहे. मुकुल वासिनक युवा मंचाच्या माध्यमातून ते सामाजिक काम करत असतात. सध्या काँग्रेसचे बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणून ते कार्यरत आहे. परंतू ते आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
काल या स्वरूपाची सोशल मीडियावर पोस्ट आ.गायकवाड यांचे खंदे समर्थक योगेश परसे यांनी सुध्दा टाकली आहे.
“इलाका तुम्हारा धमाका हमारा…”
ऑपरेशन टायगर
Wait and Watch
धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड…”, अशा स्वरूपाची पोस्ट टाकल्याने राजकीय चर्चांंना उधाण आले आहे. आज दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.