◾ अन्न व औषधी प्रशासनातील “माणूसकी” जपणारा अधिकारी
बुलढाणा, 6 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : कर्तव्यापेक्षा अधिक व्यापक होऊन सामाजिकता जपणाऱ्या अधिकाऱ्यांप्रति समाज नेहमी आदरभाव जपतो. कोरोना काळात संवेदनशीलता जपून माणूसकी जीवंत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये गजानन घिरके यांचे नांव घेतले जाते. श्री घिरके यांना वाशीम येथे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. विशेष म्हणजे बुलढाण्याचा प्रभारही त्यांच्याकडे असणार आहे.
मागिल एका वर्षांपासून गजानन घिरके हे बुलढाणा येथे अन्न व औषध प्रशासन कार्यालय औषध निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अतिरिक्त पदभार होता. वाशीम येथे त्यांची सहाय्यक आयुक्त (औषधे पदी पदोन्नती महाराष्ट्र शासनाने दिली आहे. सहायक आयुक्त घिरके हे बुलढाण्यातील नामांकित असलेल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सदस्य तथा महात्मा फुले वाचनालयाचे उपाध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर इगतपुरी येथील विपश्यना केंद्राचे उपकेंद्र असलेल्या पांगरी, ता. जि. बुलडाणा येथील धम्मकिरण विपश्यना केंद्राचे ते ट्रस्टी आहेत. तसेच औषध निरीक्षक कल्याणकारी संघटना म. राज्य, अमरावती विभागाचे सह सचिव तथा बुलढाणा जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष होते. गजानन घिरके अन्न व औषध सहाय्यक आयुक्त पदोन्नतीचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असून या निवडीमुळे सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.