spot_img

चिखलीचे विस्तार अधिकारी पंढरी मोरे मिस्टर इंडीया की सुपरमॅन ?

बुलढाणा, 21 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः जी व्यक्ती एकाच ठिकाणी राहुन दोन पदांचा प्रभार सांभाळू शकते, ती पुरुष नसते.. ती ‘महापुरुष’ असते ! पण जी व्यक्ती चिखलीत एका पदावर कार्यरत आहे आणि बुलढाण्यातील दोन पदांचा प्रभारही सांभाळते, ती व्यक्ती एकतर ‘मिस्टर इंडीया’ असेल किंवा ‘सुपरमॅन’ असू शकते. चिखलीचे शिक्षण विस्तार अधिकारी पंढरी श्रीराम मोरे यांच्याबाबतीत असेच आहे. अर्थात त्यांना मिस्टर इंडीया किंवा सुपरमॅन ही विशेषणे गुड इव्हिनिंग सिटीने लावलेली नाही. तर त्यांच्याबाबत चार पानांची मोठी तक्रार मुंबईपासून बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलपर्यंत देण्यात आलेली आहे. चिखलीतही शिक्षण विस्तार अधिकारी पदावर मूळ पदस्थापना असूनही बुलढाणा येथे गटशिक्षणाधिकारी आणि शालेय पोषण आहार अधीक्षक अशा दोन ठिकाणचा पदभार सांभाळून पंढरी मोरे हे केवळ मलीदा लाटत आहेत आणि नियमबाह्य कामे करून भ्रष्टाचार करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चिखली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना बुलढाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे की, त्यांनी राजकीय पुढार्‍यांशी संगनमत करून वर्ग 3 चे पद असतांना वर्ग 2 चे अतिरिक्त पदे मिळविली आहे. यामध्ये त्यांनी अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिरिक्त प्रभार च्या नावाखाली पंढरी श्रीराम मोरे, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग- 3 चिखली यांना अनियमिततेने सर्व तालुक्यात, पं.स. बुलढाणा या गटशिक्षणाधिकारी वर्ग 2, पं.स बुलढाणा आणि अधिक्षक वर्ग-2 शा.पो.आ. दोन पदांवर प्रतिनियुक्ती देऊन शासनाची फसवणूक झाल्यामुळे आणि त्यांचेविरुध्द तक्रारी असल्यामुळे दोन्ही प्रभार काढून त्यांना त्यांचे मुळ नियुक्तीच्या पदावर काम करण्यासाठी कार्यमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पंढरी श्रीराम मोरे हे पंचायत समिती चिखली, जि. बुलढाणा येथे विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-3 या मुळ पदावर मुळ नियुक्तीच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत. त्यांचे मुळ कार्यरत पद हे वर्ग-3 चे असुन त्यांनी पंचायत समिती चिखली येथे दररोज कार्यालयीन वेळ सुरु होतांना उपस्थित होऊन कर्मचारी हजेरी पंजीवर उपस्थितीची स्वाक्षरी करणे आणि त्यांचे मुळ पदस्थापनेचे पद विस्तार
अधिकारी (शिक्षण) बाबत कर्तव्यसुचीनुसार नेमुन दिलेली कार्यालयीन कामे ग.शि.अ. आणि ग.वि.अ. पं.स.चिखली यांचे नियंत्रणात पूर्ण करणे अनिवार्य आहे. तथापि पंढरी मोरे हे स्थानिक राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधी आणि जि.प. कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन, राजकीय व आर्थिक हितसंबंध जोपासुन आर्थिक लालसेपोटी फिल्डिग लावून गट शिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधिक्षक आदी पदांवर अतिरिक्त प्रभार बाबतची ऑर्डर मिळवून त्यांचे मुळ नियुक्तीच्या पदास (शिविअ) नेमुन दिलेली कर्तव्ये पूर्ण करीत नाहीत. यापूर्वीसुध्दा त्यांनी पंचायत समिती मोताळा आणि पंचायत समिती चिखली येथील गट शिक्षणाधिकारी आणि अधिक्षक शालेय पोषण आहार हा अतिरिक्त प्रभार मिळवून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणे, अनियमितता करणे, शिक्षकांना धमकावणे, चौकशी प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार, अनियमिततता करणे, प्रकरण मॅनेज करुन चुकीचे खोटे चौकशी अहवाल देणे, शिक्षकांचे हजेरी मस्टर शाळेतुन उचलुन आणणे, पैशाची मागणी करणे अशा अनेक तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त आहेत परंतु संबंधिताच्या राजकीय हितसंबंध आणि जि.प. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी लागे बांधे असल्यामुळे त्या तक्रारींवर कार्यवाही/चौकशी करण्यात आलेली नाही.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत