spot_img

मरण स्वस्त झालयं.. जगणे अवघड झाले !

मरण स्वस्त झालयं, जगणे अवघड झालय. आपल्या रोजच्या डयुटी चक्रातुन थोडीशी उसंत मिळावी,
परिवाराला वेळ देता यावा यासाठी देवदर्शनाहुन परतत असतांना मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी पोलीस
उपायुक्त डॉ. सुधाकर पठारेंचे अपघाती निधन झाले. पोलीस दलातील एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला मुंबई पोलीस
दलाने गमावलं. या आणि अशा कितीतरी घटनांमध्ये पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी आपले प्राण
गमावतात. गेल्या पाच वर्षात एकटया मुंबईत जवळपास 800 च्या वर पोलीसांचे अपघाती मृत्यु झाल्याची बातमी आहे.
इतर विभागाचा एक सामान्य कर्मचारी जिथे 8 तास डयुटी बजावुन आपल्या घरी परततो तिथे पोलीसाला मात्र वेळेचे
बंधन नसते. सतत ड्युटीमुळे त्यांना प्रचंड मानसिक व शारिरीक ताण सहन करावा लागतो. वेळी अवेळी जेवणाने
प्रकृतीच्याही तक्रारी वाढत जातात. या ताणापायी ह्र्दयविकाराच्या झटक्याने अथवा पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या
करुन कितीतरी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. खरे पाहता राजकारण्यांच्या हातातील कळसुत्री बाहुले
बनलेल्या या खात्याला समजुन घेणारा कोणी वाली नाही. पोलीसांची वसाहत, ड्युटीचे तास यांवर माजी गृहमंत्री
आर.आर.आबा पाटील यांनी थोडेसे विशेष लक्ष दिले होते खरे पण त्यानंतरच्या एकाही गृहमंत्र्याला त्याची गरज वाटली
नाही. केवळ पोकळ घोषणांचा पसारा करुन वाहवाही मिळविणे या पलिकडे पोलीसांच्या परिस्थितीत फार काही बदल
झाला नाही. काही गृहमंत्री केवळ खात्याकडुन मिळणाऱ्या कलेक्शनवरच लक्ष ठेवुन असायचे असा आरेाप बरेचदा होतो.
म्हणुनच की काय, गृहखाते मिळविण्यासाठी पक्षातील नेत्यांची स्पर्धा लागलेली असते. महागाई वाढली, मोर्चा काढला
आवरणारा कोण तर पोलीस, औरंगजेबाची कबर काढावी म्हणुन उत्साहात हिरवा झेंडा जाळला त्यावर दंगल उसळली,
दगड गोटे खाणारा कोण तर पोलीस, दंगलीतील निर्ढावलेल्या आरोपींची पोलीस अधिकाऱ्याच्या हातावर कुऱ्हाडीने वार
करण्याइतपत मजल जाते याला जबाबदार कोण? महिला सुरक्षा म्हणुन आवई उठविणाऱ्यांना महिला पोलीसांचा
झालेला विनयभंग का दिसु नये. बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला, धमकी देणाऱ्या आमदारांना एवढेच नव्हे तर विविध
गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना सहीसलामत गर्दीतुन बाहेर काढणारा, आपल्या सुरक्षेसाठी रात्री बेरात्री गस्त घालणारा
जर कोणी असेल तर तो पोलीस. तो पोलीसच आहे की जो जागी राहतो म्हणुन तुम्ही आम्ही निवांतपणे झोपु शकतो.
पोलीसाला मात्र पाहिजे तो सन्मान आजवर मिळालेला नाही. सामान्य जनतेला त्यांचं रुक्ष वागणं खटकतं तर
गुन्हेगांरांना त्यांच्या कृती. पोलीसालाही आपल्यासारखेच कुटूंब आहे, त्याला ही त्यांच्या कुटूंबाला वेळ देण्याची ईच्छा
होत असेल परंतु वरिष्ठांच्या आदेश या एकाच गोष्टीवर पोलीसांच पुर्ण खातं सुरु राहतं. पोलीसांच्या स्वाभीमानाला
जपणारा वर्गच मुळात अस्तित्वात नाही. बऱ्याचदा त्यांचे स्वत:कडुनही या स्वाभीमानाला तिलांजली दिल्या जाते.
मध्यमंत्री अशाच स्वाभीमान गहाण ठेवणाऱ्या काही घटना घडल्या ज्यात एका नेत्याला पायात जोडे घालुन देणारा, एका
नेत्याची गाडी धुणारा पोलीस कर्मचारी बराच व्हायरल झाला. पण म्हणुन तो विरोध करु शकत नाही हे ही तितकच
सत्य आहे. आणि विरोध केलाच तर चित्रपटात दाखवतात तसे ऐसी जगह ट्रान्सफर करुंगा के घर देखने तरस जाओगे,
अशा धमक्या मिळतही असतील. काही नेत्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ज्याच्या पासुन लोकांना धोका आहे,
त्यांना पोलीस संरक्षण असतं हे कटु सत्य आहे. कालपरवा एका दारु विक्रेत्याचा पाठलाग करतांना दारु विक्रेत्याने
पोलीसांच्या दुचाकीला लाथ मारल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना
बुलढाणा जिल्हयात घडली. अवैध रेतीच्या टिप्परनेही पोलीसांच्या वाहनाला जोरदार धडक देवुन अपघात
घडविण्याच्या, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलीसांवर अख्या गावाने हल्ला केल्याच्या घटना सर्रासपणे ऐकायला
मिळतात. याला जबाबदार कोण? अवैध रेती विक्रेता, दारु विक्रेता, अट्टल गुन्हेगार यांना असलेला राजाश्रय हा मुळात
या संबंध मुजोरीला जबाबदार असल्याचे दिसुन येते. त्यांच्याकडुन मिळणारी मनी पॉवर असेल किंवा मॅन पॉवर यामुळे
राजकारण्यांना त्यांचे ऐकावे लागते मात्र या सर्वांमध्ये बळी कोणाचा जात असेल तर तो पोलीसाचा जातो. निदान या
खात्याला ड्युटीचे तास समन्यायी पध्दतीने वाटप होतील, त्यांचेवरील राजकीय दबाव कमी होईल व त्यांनाही कुटूंबाला
वेळ देता येईल अशी आजच्या नववर्ष दिनी अपेक्षा करुयात. सलाम त्या पोलीस दादाला.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत