- दरोडेखोर सिसिटीव्हीमध्ये कैद
बुलढाणा, 7 एप्रिल (गुड इव्हिनग सिटी) ः दोन दिवसांपूर्वी येथून जवळच असलेल्या दहीद बु. गावांत दरोडा पडला. मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी दहीदमधील चार घरांवर दरोडा टाकला. तीन ठिकाणाहून त्यांना काही मिळाले नाही, परंतु जिजाबाई देवकर यांच्या बंद घरातून त्यांनी 6 तोळे सोने लूटून नेले. विशेष म्हणजे चारही दरोडेखोर सिसिटीव्ही फूटेजमध्ये कैद झाले असून त्यांच्या हातात पहार, काठी, चाकू अशी साधने दिसत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास नेहमीप्रमाणे सुरु आहे.
गुड इव्हिनिंग सिटीला श्रीमती जिजाबाई ज्ञानदेव देवकर (वय 75) यांनी सांगितले की, त्यांना राजेंद्र आणि सुभाष अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुले सुनांसह बुलढाणा शहरात राहतात. त्यामुळे जिजाबाई दहीद बु. येथे आपल्या घरी कामानिमित्त जातात आणि पुन्हा परत बुलढाण्याला येतात. शुक्रवार, 4 एप्रिल रोजी त्या दहीदला कामानिमित्त गेल्या आणि रात्री 9 वाजता जेवण आटोपून जिजाबाई पुतण्या प्रभाकरकडे झोपण्यासाठी गेल्या. सकाळी 5 वाजेच्या दरम्यान जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. आत जावून पाहीले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आणि घरून दागिन्यांचा डबा चोरलेला दिसला. जिजाबाई यांनी मधल्या खोलीतील जर्मनच्या डब्यात स्वर्गीय पतीने दिलेले दागिने जपून ठेवले होते. हा डबा दरोडेखोरांनी चोरून नेला. चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये 3 तोळ्याची गहू पोत, 1 तोळ्याचे गहू मणी, सोन्याची एक दाणी, सोन्याच्या तीन अंगठया असे मिळून एकुण 6 तोळ्यांचे दागिन्यांचा समावेश आहे. ज्यांनी जिजाबाईंच्या घरी दरोडा टाकला, त्या दरोडेखोरांनी गावातीलच पुरुषोत्तम नामदेव देवकर, कुणाल शालीकराव राऊत आणि युवराज सिताराम दुतोंडे यांच्याही घरी चोरीचा प्रयत्न केला. पण त्यांना काही आढळले नसल्याने चोरी झाली नाही. या दरोड्याचा तपास एपीआय शरद माळी करीत आहेत. श्री माळी यांना सदर प्रकरणात तपासाची गति काय, याबाबत संपर्क करण्यात आला, परंतु त्यांनी कॉल उचलले नाही. महत्वाची बाब म्हणजे दहीदमध्ये उत्पात माजविणाऱ्या या दरोडेखोरांचे सिसिटीव्ही फूटेज गावकऱ्यांनीच पोलिसांना पोहोचविले आहेत. परंतु तपास अधिकाऱ्यांना दरोडेखोर सापडत नाही, याचे आश्चर्य आहे.