spot_img

क्रीडा संकुल परिसरातील गोठ्यावर बिबट्याचा हल्ला : तीन वासरांचा फडशा

वनविभागाला संवेदनशीलतेचे प्रशिक्षण आवश्यक

बुलढाणा, 11 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : क्रीडा संकुल परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून काल, गुरुवारच्या मध्यरात्री बिबट्याने गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढवून तीन वासरांचा फडशा पाडला. क्रीडा संकुलच्या भिंतीला लागून दुर्गादास काळे यांचा गोठा आहे. या गोठ्यात जवळपास 20 गुरे ढोरे आहेत. आज सकाळी शेतकरी काळे जेव्हा गोठ्यात नित्यानेमाने पोहोचले तेव्हा दोन गोऱ्हे आणि एक गाईचे पिलू मृतावस्थेत आढळले. एका वासराचे पोट फाडलेले तर इतर दोन वासरांचे गळे चावलेले होते. बिबट्याने गोठ्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट होते. वासरांना खुंटीला बांधलेले असल्यामुळे बिबट्याला आपली शिकार नेता आली नाही. सदर गोठा गायकवाड ले आऊट मधील रामलक्ष्मी नगर मध्ये आहे. या परिसरात अनेकांनी घरे बांधली आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने बिबट्यांनी नागरी वस्तीकडे पाऊले वळविल्याचे सदर प्रकरणातून अधोरेखित होत आहे. परिणामी क्रीडा संकुल परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाला सदर घटनेबाबत कळविण्यात आले आहे. मृत पावलेली वासरे केवळ एका महिना वयाची आहेत. गंभीर बाब म्हणजे वनपाल मोहसीन खान यांना घटना कळविल्यानंतर त्यांनी येण्यासाठी तीन ते चार तास लागतील, असे बेदरकारपणे उत्तर दिले. शेतकरी दुर्गादास यांनी आपली वासरं गमावलीत. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वासरांविषयी असलेला लळा वेगळा… अशा अवस्थेत दुःखी असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी किंवा तत्काळ पोहोचून शेतकऱ्याला हिम्मत देण्याऐवजी त्याला असे बेमुरव्वत उत्तर देणे, खटकण्यासारखे आहे. वनविभाग शेतकऱ्यांप्रति किती असंवेदनशील आहे, याची प्रचिती शेतकरी दुर्गादास काळे यांना आली आहे. पत्रकारांकडून जेव्हा पद विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात संपर्क करण्यात आला तेव्हा कुठे वनपाल श्रीकांत आणि वनरक्षक श्री झोटे पंचनामासाठी घटनास्थळावर तात्काळ पोहोचले. वनविभागाच्या भरतीमध्ये इतर प्रशिक्षणासोबतच संवेदनशीलता जपण्याचे प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान सदर बाब वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. शेतकरी काळे यांना वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत