गुम्मीतून एकाला अटक
बुलढाणा, 11 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटीे) ः जनुना-गुम्मीच्या शिवारात अंदाजे एका महिन्यापूर्वी विषबाधेतून दोन बिबटयांचा मृत्यू झाला होता. संशयस्पदरित्या बिबट्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यामुळे वनविभागाने तपासाचे चक्र फिरवले. तब्बल एका महिन्यानंतर काही पुरावे हाती येऊन वन विभागाने आरोपी सुनिल रामदास दांडगे वय 35 वर्षे रा.गुम्मी याला अटक केली आहे. ही घटना बुधवार, दिनांक 9 एप्रिलच्या दरम्यान समोर आली आहे. 9 एप्रिल रोजी वन विभागाच्या टीमने जनुना गावच्या शिवारातून बिबट्याची हाडे जमा केली होती. त्यानंतर ती तपासणीकरीता पाठवल्यानंतर बिबट्यांना बकर्याचे मटनातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वनविभागाच्या टीमने गुम्मी येथील सुनिल रामदास दांडगे वय 35 याला अटक केली आहे. परंतू यामध्ये एकट्या सुनिल दांडगे ने हा प्रकार केला की अजून त्याच्या सोबत कोणी आहे हे तपासनंतरच समोर येईल. आज 11 एप्रिल रोजी आरोपी सुनिल दांडगे यास सोबत घेऊन वन विभागाची टीम पुढील तपास करीत आहे.
सुनिल दांडगे यांनी औषध टाकून बिबट्यांना का मारले ? यामागे तस्करी की, इतर काही कारण आहे का ? याचा शोध घेतला जात आहे. काही गावकर्यांच्या मते दांडगे यांच्या बकर्यांना बिबट्याने मागील काळात शिकार करून संपविले होते. त्याचाच राग म्हणून दांडगे यांनी बिबट्यांना मारण्याचे पाऊल उचलेले असावे, असा अंदाज आहे. बिबट्यांचा शेतकर्यांना होणार्या त्रासाची वन विभागाने दखल न घेतल्याने शेतकरी असा टोकाचा निर्णय घेत असतील तर तो योग्य म्हणता येणार नाही.