ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या महात्मा ज्योतीबा फुले यांचा आज जन्मदिवस. महात्मा फुले यांनी शिक्षण हा पुरुष आणि स्त्रियांचा प्राथमिक अधिकार असल्याचे त्यावेळी जगाला ठणकावुन सांगीतले. महात्मा फुलेंचा इतिहास त्यांच्या पुस्तकातुन जगासमोर आहेच. त्याच पुस्तकात दिल्यानुसार त्यांना या कामात ज्यांनी मदत केली त्यांचा आणि ज्यांनी विरोध केला किंवा ज्यांच्याशी संघर्ष झाला त्यांच्याही उल्लेख आहेच. याच पुस्तकरुपी माहितीतुन जर एखादा चित्रपट उभा राहत असेल तर त्यात वाईट वाटायचं कारण नसावं. मात्र आज 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार्या ‘फुले’ चित्रपटातुन ब्राम्हण समाजाचे कलंकित चित्रण केल्याचे सांगत ब्राम्हण महासंघाने या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. लागलीच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे प्रदर्शन दोन आठवडे पुढे ढकलण्यात आल्याचे जाहिर केले. एवढेच नव्हे तर चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यात आवश्यक ते बदल करतील अशी सुचना देखील दिली. फुले चित्रपटातुन एखाद्या समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असेल तर संभाजी महाराजांची प्रतिमा मलीन करणारे कोण? सावित्रीबाईंवर शेणाचे गोळे फेकणारे कोण? बाबासाहेबांना वर्गाबाहेर काढणारे कोण? शाहु महाराजांना छत्रपती मानायला नकार देणारे कोण? तुकारामांची गाथा बुडविणारे कोण? एवढेच काय तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालकांना देहत्याग करायला लावणारे कोण? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच असेल असे चळवळीतील कार्यकर्ते सांगतात. इतिहास हा जसाच्या तसा मांडला गेला पाहिजे एखाद्या समाजाला वाईट वाटेल म्हणुन इतिहास बदलुन महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न पडतो. हा समाज चांगला किंवा तो समाज वाईट हा विषयच नाही पण पुर्वजांनी केलेले पाप येणार्या पिढीलाच भोगावे लागते अशा अर्थाचा वाक्प्रचार सर्वश्रुत आहे. आणि त्यांनी केलेल्या पापाचे मानकरी तेच होते तुम्ही आपले उगाच अंगावर ओढुन घेताय तसेच चित्रपटाने वाद वाढु शकतो म्हणत प्रदर्शन पुढे ढकलणारा सेन्सॉर बोर्डाने हीच तत्परता केरला स्टोरी व काश्मिर फाईलच्या वेळी का दाखविण्यात आली नाही, असाही एक विचार काही जाणकार व्यक्त करतात. त्या चित्रपटातही केवळ एकाच समाजावर दोष लादण्यात आलाय. महापुरुषांचे चित्रपट त्यांनी केलेले महान कार्य जनतेसमोर आणतात. त्यामुळे त्यात अतिरंजीतपणा ही नसावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही. महात्मा फुले यांच्याबाबतीत ब्राम्हण समाजाने वाईट केले अशी जर धारणा तयार होत असेल तर ती साफ चुकीची ठरेल. फूले दाम्पत्याने ज्या वाडयात शाळा काढली ते भिडे कोण होते? सत्यशोधक समाजाचे त्याकाळचे कार्यकर्त्याची यादी वाचली तर आपल्या लक्षात येईल की ब्राम्हण समाजातील सुधारणावादी विचारवंताची महात्मा फूलेंना समर्थपणे साथ लाभली. सावित्रीबाईंवर शेण फेकणारा मुलगा ब्राम्हण दाखवला म्हणुन जर समाजाची बदनामी होत असेल तर त्याला कोण दाखवावा याचही उत्तर दिल्या गेलं पाहिजे. ते तरी बरं की फातीमा शेख यांच्या कुटूंबातील सदस्य उस्मान शेख यांनी महात्मा फुलेंना त्यांच्या कार्यात साथ दिली, नाहीतर आजची परिस्थिती पाहता त्या नावाशी साधम्य असणार्या नावाकडे शेणाचे गोळे तरी दाखवता आले असते. चित्रपटातील पात्र बदलली म्हणुन सत्य लपणार नाही. त्यावेळी झालेली चिखलफेक, आज समाजमाध्यमातुन होणार्या चिखलफेकीपेक्षा काही वेगळी नव्हती हे नाईलाजाने कबुल करावे लागेल. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची दारे उघडी केली. त्या शिक्षणामुळे स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने सर्वच आघाडयांवर काम करतांना दिसत आहेत. मात्र आजही मनुवादी प्रवृत्तीचे लोक अस्तित्वात आहेत. काल-परवा तामीलनाडुतील एका स्वामींच्या नावावर असणार्या शाळेमध्ये पाळी आली म्हणुन एका विद्यार्थीनीला बाहेर बसवुन पेपर लिहायला सांगण्यात आले. या वृत्तीला मनुवादी वृत्ती नाहीतर काय म्हणावे. चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा हया विद्यार्थीनीच्या समर्थनार्थ त्या वृत्तीविरोधात एखादा समाज उभा राहीला असता तर अधिक बरे झाले असते.