spot_img

आवाज बुलढाण्याचा

फार वर्षापुर्वी एक उल्कापात झाला आणि लोणार सरोवराची निर्मीती झाली, जगातील तिसर्‍या क्रमांकाचे खार्‍या पाण्याचे सरोवर ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचे नांव म्हणजे बुलढाणा. आद्य स्त्री लेखिका ताराबाई शिंदे यांचं मुळ गांव म्हणजे बुलढाणा. संत गजानन महाराज समाथीस्थळ जिथे अस्तित्वात आहे तो जिल्हा म्हणजे बुलढाणा. ही आणि आणखी काही फार थोडी वैशिष्ट्ये असलेला आपला बुलढाणा जिल्हा राजकीय दृष्ट्या तसा चमकलेला नव्हताच मुळी. लोकप्रतिनिधींचे म्हणालं तर कार्यकर्तृत्वाने आपल्या कामगीरीचा ठसा उमटविणार्‍या बर्‍याच जणांना मंत्रीपदही लाभले ज्यात शिवाजीराव पाटील, राजेंद्र गोडे, राजेंद्र शिंगणे, प्रतापराव जाधव, डॉ.संजय कुटे, अ‍ॅड.आकाश फुंडकर इत्यादी. परंतु वकृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपले अस्तित्व तसे नगण्यच होते. आज मात्र तशी परिस्थिती नाही. आपल्या वकृत्वाच्या जोरावर आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रात स्वत:चे पर्यायाने बुलढाण्याचे नांव प्रसिध्द केले आहे. तसे त्यांच्या वक्तव्याला विरोधक बेताल म्हणत असले तरी बाळासाहेबांचा विचार जपणारी शिवसेना व त्या जुन्या शिवसेनेचे कार्यकर्ते राहीलेले संजय गायकवाड यांनी तोच आक्रमकपणा आणि मागपुढचा विचार न करता बेधडक बोलण्याची परंपरा जपली आहे हे विशेष. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर विरोधकांना अंगावर घेणारा आमदार म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली. शिंदे सेनेचे स्टार प्रचारकात समाविष्ट संजय गायकवाड वेळप्रसंगी महायुतीचे प्रवक्ते देखील बनतात. आपल्या आक्रमक भाषणातुन संजय राऊत, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस एवढेच काय तर राहुल गांधीपर्यंत पोहचलेले ते बुलढाणा जिल्हयाचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर द्यायला जी व्यक्ती सर्वात पुढे असते ती म्हणजे बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ. त्यांच्या कमी शब्दात जशास तसे उत्तर देण्याने मागील काही दिवसांत बुलढाणेकरांचे भरपुर मनोरंजन झाले. विधानसभेत महाविकास आघाडीला सुटलेल्या जागेमुळे आमदारकीच्या तिकीटावर पाणी सोडलं असलं तरी त्यांच्या त्याग वाया गेला नाही. आज ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे प्रदेशाध्यक्ष म्हणुन विराजमान असुन पक्षाची अधिकृत भुमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडतांना दिसुन येतात. या दोघामंध्ये रंगलेला हा सामना विधानसभा निवडणुकांच्या वेळी तिहेरी प्रकारात रुपांतरीत झाला. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातुन आपल्या वकृत्वाचा ठसा उमटविणार्‍या जयश्रीताई शेळके यांच्या रुपाने बुलढाण्याला एक चांगला वक्ता मिळाला. विद्यमान आमदारांना नकली वाघ म्हणत हल्लाबोल करत जयश्रीताई यांनी विधानसभेचा बिगुल वाजवला खरा पण फार थोडया फरकाने त्यांचा पराभव झाला. जयश्रीताई यांचा पराभव झाला असला तरी त्यांची वकृत्वशैली मात्र सर्वांच्या लक्षात आली आणि म्हणुनच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्तेपद त्यांना मिळाले. एकीकडे एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासु आणि पक्षाचे प्रवक्तेपद नसले तरी पक्षाची भुमिका जाहिर करणारे आमदार संजय गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना उबाठा गटाच्या अधिकृत प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या रुपाने बुलढाण्याची महाराष्ट्राच्या राज्यस्तरावरील राजकारणात उल्लेखनिय अशी दखल घेतल्याचे दिसुन येत आहे. भविष्यात या तिघांच्या वकृत्वाच्या जुगलबंदीतुन वर्तमानपत्राचे मथळे भरले जातील, मिडीयालाही आयती मेजवानी मिळेल एवढे मात्र खरे. राहीला प्रश्न इतर पुढार्‍यांचा जसे आ.धिरज लिंगाडे, विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, राहुल बोंद्रे, नरेंद्र खेडेकर, जालींधर बुधवत यांचा तर हे आपले ‘दुरुन डोंगर साजरे‘ म्हणत या तिघांच्या शाब्दीक लढाईपासुन चार हात लांबच राहतील असे म्हणायला हरकत नाही. तसे म्हणायला रविकांत तुपकर ही चांगले वक्ते आहेत मात्र त्यांचे वागणे, बोलणे व कार्य शेतकर्‍यांसाठी समर्पित असल्याने ते यामध्ये लक्ष घालण्याची शक्यता धुसर आहे. राहीला प्रश्न भुमीपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांचा, तर ते न बोलता कोणाचा कार्यक्रम ‘करेक्ट’ करतील हे येणारा काळच सांगेल.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत