◾विचारवंत ज्ञानेश महाराव यांचा जाहीर दावा
बुलढाणा, 13 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजितसिंग राजपूत) : ज्येष्ठ संपादक तसेच विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी गंभीर दावा केला आहे की, महायुतीचे सरकार ईव्हीएम मधील गडबड करून आणले गेले आहे. “लाडक्या बहिणी”चा काहीच संबंध नाही.. जर हे खोटं असेल तर व्हिव्हिपॅटच्या चिठ्ठ्या मोजून दाखवा असे खुले आव्हान पण श्री महाराव यांनी दिले आहे.
सार्वजनिक बाबासाहेब आंबेडकर-महात्मा फुले जयंती उत्सव समितीकडून आठवडाभर विविध सामाजिक सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 12 एप्रिल रोजी संध्याकाळी गांधी भवनमध्ये विचारवंत ज्ञानेश महाराज यांचे व्याख्यान झाले.
यावेळी मंचावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तर कुणाल पैठणकर यांनी प्रास्ताविक तसेच संचालन उत्सव समितीचे सचिव दीपक मोरे यांनी केले. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश राऊत, साहित्यिक सुरेश साबळे, शाहीर डी आर इंगळे, अन्न व औषधी प्रशासन सहायुक्त गजानन घिरके, नेत्रशल्यचिकित्सक डॉक्टर शोण चिंचोले, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काटकर, इतिहास सत्यशोधक ज्ञानेश्वर खांडवे, प्रमोद टाले तथा चंद्रकांत बर्दे, राजेश डीडोळकर, नितीन शिरसाट, राजेंद्र काळे अरुण जैन, लक्ष्मीकांत बगाडे, सचिन लहाने, संजय जाधव इत्यादी पत्रकार बांधवांची मंचावर उपस्थिती होती.
आपले विचार मांडताना ज्ञानेश महाराव म्हणाले की, सीतेच्या अग्नी परीक्षेची गोष्ट करणारे सरकार स्वतःची अग्निपरीक्षा का देत नाही? व्हिव्हिपॅट हे फक्त दाखवण्यासाठी नाही, मोजण्यासाठी सुद्धा असतं आणि ते अख्खाच्या अख्खा चिठ्ठ्या मोजायला घाबरतात कशाला? हा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक झाल्यानंतर 49 कायदे नंतर बदलले का गेल्या? निवडणूक विभागाला हाताशी धरून सहा महिन्यात निवडणुकांबद्दलचे जे कायदे बदलण्यात आले, त्यातून ईव्हीएमचा गफला झालेला हे स्पष्ट झालेले आहे आणि विशेष म्हणजे फुले शाहू आंबेडकरांना मानणारी लोकं 2008 पासून ईव्हीएम च्या विरोधात बोलत होती… त्याकाळात लालकृष्ण अडवाणी यांनीही त्याचे प्रतिनिधित्व केले होते, याची आठवण श्री महाराव यांनी करून दिली. अर्थातच ईव्हीएम झूठ असल्याचा दावा त्यांनी केला.
- हिंदवी स्वराज्याची व्याख्या सांगितली
हिंदू किंवा हिंदुत्व याचा हिंदवी स्वराज्याची संबंध नसल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. आपला मुद्दा पटवून देताना ते म्हणाले की कवी शायर अमीर खुसरो याने पंधराशे शतकामध्ये पहिल्यांदा हिंदवी शब्दाचा प्रयोग केला होता. ब्रजभाषा, संस्कृत, उर्दू आणि हिंदी मिळून एकत्र केलेल्या भाषेला त्याने हिंदवी म्हटले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे अठरा पगड जातीतील लोकांना एकत्रित करून त्यांना मावळे बनवले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा नको
बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अंगीकारल्याचे अनेक बुद्धिस्ट सांगतात. पण हीच लोकं कर्मकांडांच्या आहारी गेली आहेत. हळूच जन्म कुंडली काढून 36 गुण जुळवितात. म्हणजे इकडे बुद्धाकडेही जायचं आणि स्वामीच्या मठातही चकरा मारायच्या, हे थोतांड बंद केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समाजाला विचारशील करण्याच्या कामी आपला मेंदू वापरला गेला पाहिजे. आपले विचारही बदलत नाहीत आणि आमचे पक्षही बदलत नाही… आमचा पक्ष असतो तो सत्याचा… सत्तेचा नसतो!! सत्तेसमोर सत्य सांगायची हिम्मत ठेवणे म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा जयजयकार करणे, असे महत्त्वपूर्ण विधानही त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील आदर्श किस्से सांगून त्यांनी प्रबोधन केलेच परंतु नाव न घेता प्रधानमंत्री मोदी यांच्या विरोधातही त्यांनी टीका केली. याशिवाय महिला सक्षमीकरण, भारतीय संविधान याचे महत्त्व सांगताना त्यांनी मनुवादावर प्रचंड टीका केली.
व्याख्यान कार्यक्रमाला शहरातील बुद्धिजीवी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.