बुलढाणा, 14 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) : राजकारणात कुणीच कुणाचं दीर्घकाळ मित्र किंवा दुष्मन नसतं… सोबत निवडणूक लढणारे भाजपा आणि शिवसेना आज एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत तर ज्या काँग्रेसला शिवसेनेने कायम विरोध केला, ती काँग्रेस महाविकास आघाडीत एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार संजय गायकवाड दोघे एकत्र येऊ शकत नाही, असा दावा करणे योग्य ठरणार नाही. भविष्य कुणी पाहिलं आणि राजकारणात काहीही शक्य असतं… तसं पाहिलं तर या दोघांमध्ये कमालीचे राजकीय वैर आहे. गायकवाड यांच्यावर विधानसभा निवडणुकीत सपकाळ यांनी प्रखर टीका केली होती. सपकाळ यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविण्याची एकही संधी गायकवाड सोडत नाही. अर्थात राजकीय मतभेद असले तरी मनभेद होऊ नये, याची काळजी घेतात तेच खरे राजकारणी असतात. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमामध्ये या दोन राजकीय विरोधकांची झालेली भेट याचीच प्रचिती देत होती. दोघांची भेट झाली ! मग काय चर्चा झाली?? निवडणुकांच्या अनुषंगाने काही बोलले का?? अशा प्रश्नांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण थांबा, इतक्या पुढे जाण्याची गरज नाही. दोघांमध्ये फक्त नमस्कार झाला, दुसरं काहीच नाही. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार संजय गायकवाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्याने जयस्तंभातील स्मारकावर अभिवादन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अचानक आणि योगायोगाने एकमेकांच्या समोर आल्यावर राजकीय विरोध बाजूला सारून एकमेकांना नमस्कार करत भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार नंतर शेक हॅन्ड पण झाले. एकमेकांकडे पाहून स्मित हास्य झाले. विरोध असला तरी माणूसकी आणि राजकीय संस्कृती जपणारा या दोघांमधील हा क्षण प्रेस फोटोग्राफर रविकिरण टाकळकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. गुड इव्हिनिंग सिटीलाही हा सकारात्मक प्रसंग शब्दांकित करण्याचा मोह आवरला नाही.