ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह दोन हवालदारांचा समावेश
बुलढाणा, 29 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, बुलढाणा सायबर पोलिस स्टेशन येथे कार्यरत तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलिस हवालदार राजू आडवे व पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस हवालदार सुनिल जाधव यांना उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या अधिकार्यांना हे पदक बहाल केले जाते. संग्राम पाटील यांनी गेल्या 15 वर्षांत पुणे ग्रामीण, बुलढाणा, अकोला, मुंबई आदी भागांत उत्कृष्ट सेवा बजावली असून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बुलढाणा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते हे पदक प्रदान करणार आहेत.
जिल्ह्यात धाड, धामणगाव बढे, साखरखेर्डा आणि चिखली येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी उत्कृष्ट समन्वय साधत पोलिसिंगचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. त्यांच्या या सन्मानासाठी जिल्हाभरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.