बुलढाणा, 1 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : आज सकाळी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर शासकीय ध्वजवंदनचा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यांचे शासकीय प्रगती सांगणारे भाषणही झाले. परंतु जवळपास दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात दीड मिनिटांची संवेदना व्यक्त करण्याची गरज प्रशासनाला वाटली नाही आणि ही गंभीर बाब लोकनेते असलेल्या पालकमंत्र्यांच्याही लक्षात आली नाही, याचे आश्चर्य आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्लात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यानी कुठलीही दयामाया न दाखवता निरपराध सामान्य नागरिकांना ठार केले. भूतकांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरातून मृतकांप्रति हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पालकमंत्री मकरंद जाधव पाटील पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यात आले. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन पार पडले. परंतु दीड तास चाललेल्या कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना दीड मिनिटांची श्रद्धांजली देण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. त्यांच्या भाषणातून एक शब्दही सदर घटनेसंदर्भात निघाला नाही. त्यांनी वाचून भाषण केले. सूत्रानुसार जिल्हा प्रशासनाकडून अनेकदा हे शासकीय भाषण लिहून दिले जाते. सर्व कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात निश्चित असतो. कुणाला पुरस्कृत करायचे ते आमंत्रण पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व व्यवस्था केली जाते. शासकीय ध्वजारोहण किंवा ध्वजवंदन कार्यक्रमाची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे असते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून श्रद्धांजली न देण्याची चूक झाली यात शंका नाही. पण अभ्यासू पालकमंत्र्यांच्याही लक्षात सदरबाब येऊ नये याला दुर्दैव म्हणावे लागेल. याला जबाबदार कोण? जिल्हाधिकारी कार्यालय की, पालकमंत्री याची चौकशी होत राहिल. पण पहलगाम हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतकांचा महाराष्ट्रदिनी विसर पडणाऱ्यांनी एक भारतीय म्हणून आत्मचिंतन करावे, ही विनंती गुड इव्हिनिंग सिटी करीत आहे.