‘पत्रकारांना खोटे ठरविण्याचा प्रकार दुर्दैवी’ ; माहिती कार्यालयाने सत्य खुलासा करण्याची जिल्हा पत्रकार संघाची मागणी
बुलढाणा, 3 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः सूर्यप्रकाशाएव्हढे सत्य आहे की, 1 मे रोजी पोलिस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. त्यामुळेच सजग आणि सतर्क पत्रकारांनी वृत्तधर्माचे पालन करीत प्रशासनाला सदर बाब बातम्यांमधून लक्षात आणून दिली. असे असतांनाही बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने खोडसाळपणा करीत या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आल्याची खोटी बातमी वृत्तपत्रांना पाठविली. ज्या पत्रकारांनी सत्य छापले, त्यांना खोटे पाडण्याचा हा प्रकार निंदनीय तसेच पत्रकारांची प्रतिमा जनतेसमोर मलीन करण्याचा आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा माहिती अधिकार्यांंनी तत्काळ खुलासा करावा आणि आपले खोटे शासकीय वृत्त मागे घ्यावे, अशी मागणी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केली आहे.
शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम 1 मे रोजी सकाळी 9 वाजता झाले. त्यानंतर पथसंचलन आणि समाजाभिमुख काम करणार्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम झाला. सुमारे दीड तास कार्यक्रम झाला. परंतु या दीड तासात पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजलीसाठी प्रशासनाने दीड मिनीटांचाही वेळ दिला नाही. ही गंभीर चूक पत्रकारांनी आपल्या वृत्तांमधून मांडली. काहींनी पुढील काही मिनीटांतच आपल्या वेबपोर्टलवरून सदर चूकीला ब्रेकींग स्वरूपात व्हायरल केले. विशेष म्हणजे ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी उपस्थित असतांना कुणाच्याही ही महत्वाची बाब लक्षात आली नाही. कार्यक्रमाच्या व्यस्ततेत आयोजकांना याचा विसर पडू शकतो, हे मान्य आहे. हा काही देशद्रोह नाही. पण पुढील वेळेस चूक होवू नये, अशी अपेक्षा बातमी करतांना पत्रकारांची असते. पण या चूकीवर पांघरून घालण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने केले. शासकीय योजना, कार्यक्रम, शासनाची धोरणे वृत्तांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे आहे. जिल्हा माहिती अधिकारी शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून काम करतात. शासनाच्या चूकांवर पांघरून घालणे किंवा खोटी माहिती प्रसारित करण्याचा नियम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला घालून देण्यात आलेला नाही. शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही, हे त्याठिकाणी उपस्थित शेकडो लोकांना माहित आहे. अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस प्रशासन असे विविध घटक ही बाब जाणून आहे. पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांच्याही अंतरात्म्याला हे माहित आहे की, श्रद्धांजली न वाहण्याची चूक झाली आहे. मग असे असतांनाही बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने वृत्तपत्रांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे खोटे वृत्त पाठविले. 1 मे रोजी, दुपारी 12 वाजून 43 मिनीटांनी त्यांच्या कार्यालयाच्या ‘पशुीवळेर्लीश्रवरपरऽसारळश्र.लेा’ या अधिकृत वेबसाईटवरून जवळपास 150 पेक्षा अधिक वृत्तमाध्यमांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना ई मेल पाठवून हा खोटारडेपणा करण्यात आला.
या शासकीय बातमीत सांगण्यात आले की, “कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात पोलिस विभागाने शानदार पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मोरे यांनी केले. यावेळी पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी जम्मू आणि काश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली”.
माहिती कार्यालयाच्या सदर वृत्तामधील इतर सर्व बाबी सत्य आहेत परंतु श्रद्धांजली वाहिली, ही बाब निखालस खोटी आहे.
यासंदर्भात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी भूमिका मांडली आहे की, ‘जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने प्रशासनाच्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रकार म्हणजे पत्रकारांना खोटे ठरविण्याचे षडयंत्र आहे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय केवळ शासन आणि जनतेमधीलच दुवा आहे असे नाही तर शासन, प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वयासोबत पत्रकारांचे न्याय हक्का जपणे, पत्रकारांची प्रतिष्ठा राखणे, हे माहिती कार्यालयाचे कर्तव्य आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि प्रशासनाला वाचविण्यासाठी पत्रकारांचा बळी देण्याचा प्रकार माहिती कार्यालयाने केला आहे. म्हणून बुलढाणा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने उपरोक्त वृत्त तात्काळ मागे घेवून दिलगीरी व्यक्त करावी’, अशी मागणी श्री राजपूत यांनी पत्रकारांच्या वतीने केली आहे. तसेच सदर शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात जर खरंच श्रद्धांजली वाहण्यात आली असेल तर त्यासंबंधीचे पुरावे फोटो किंवा व्हिडिओ द्यावेत असे खुले आव्हान सुद्धा श्री राजपूत यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला दिली आहे.