बुलडाणा, 5 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे जनावरांच्या अंगावर विज पडून एक गाय, दोन बैल ठार तर दोन जखमी झाले आहे. सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात वीज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आंधळे यांनी लिंबाच्या झाडाखाली पाच जनावरे बांधलेली होती. त्याच दरम्यान आकाशात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू झाला. दुर्दैवाने वीज थेट झाडावर कोसळली आणि त्याच्या झटक्याने तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेल्या जनावरांमध्ये १ गाय, १ गोऱ्हा आणि १ बैल यांचा समावेश आहे. उर्वरित दोन जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत. या घटनेने आंधळे कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले असून, त्यांच्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जनावरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विष्णू थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. यावेळी ग्राम महसुल अधिकारी विष्णू थोरात यांनी ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांनी वीज कोसळण्याच्या संभाव्य धोक्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.