◾ ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आ. गायकवाड यांचे आवाहन
बुलढाणा, 9 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आ. संजय गायकवाड हे आहेत. बुलढाणा शहरात बुधवार, 14 मे रोजी भव्य दिव्य स्वरूपात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती साजरी केली जाणार आहे. सोमवार, 12 मे रोजी सायंकाळी 7 वाजता शिवशंभो गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभि-अम्मु यांचा शिवगीत, लोकगीत, गोंधळ असा कॉन्सर्ट शो राहील. दुसऱ्या दिवशी, 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मोटारसायकल रॅली काढली जाईल. तर सायंकाळी 7 वाजता गितराधाई उत्सवशाही हा कार्यक्रम होईल. रात्री 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जयस्तंभ चौकात भव्य लेझर लाईट शो आणि रात्री ठीक 12 वाजता फटाक्यांची भव्य आतिषबाजी होईल. बुधवार 14 मे रोजी जयस्तंभ चौकामध्ये जन्मोत्सव सोहळा आणि भव्य पाळणा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाची वेळ सकाळी नऊ वाजेची आहे. भगवे शुभयात्रीची वेळ याच दिवशी सायंकाळी पाच वाजेची राहील. शोभायात्रा जयस्तंभ चौकामधून निघेल. भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध देखाव्यांचा समावेश असणार आहे. तरी जयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, धर्मवीर आखाडा व धर्मवीर युथ फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
यासंदर्भात काल गुरुवार संध्याकाळी रोजी विश्राम भवनच्या परिसरामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. मंचावर एडवोकेट जयसिंगराजे देशमुख, राजेश हेलगे, रणजीतसिंग राजपूत, राजेंद्र काळे, मृत्युंजय गायकवाड, सिद्धार्थ शर्मा, ओमसिंग राजपूत, डॉ. दुर्गासिंग राजपूत आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक प्राध्यापक अनिल रिंढे यांनी केले. यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी शिवशंभू जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या त्याग आणि शौर्याला समर्पित कार्यक्रमांचा अंतर्भाव जयंतीउत्सवात करण्यात येईल, असे जाहीर केले.