बुलढाणा, 10 मे (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती आहे, असे सर्वजण म्हणतायेत परंतु युद्ध सुरु झाले आहे, हे सत्य आहे. सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुटीवर परतलेले बहुतांश सैनिक पुन्हा सीमेवर तैनात होण्यासाठी मिळेल त्या वाहनाने आणि आहे त्या परिस्थीतीत निघाले आहेत. सिंदखेडराजामधील सैनिक गणेश भंडारे यालाही हळद फिटल्या हातांनी तातडीने सीमेवर निघावे लागले आहे. लग्नाला उणेपुरे तीन दिवसही झाले नाही आणि देशाच्या संरक्षणासाठी निघालेल्या या सैनिकासाठी संपूर्ण गांव हळहळले..! अनेकांच्या डोळ्यांत पाणी होते पण उरात देशभक्ती आणि चेहर्यावर आपल्या गावच्या सैनिकासाठी अपार कृतज्ञता होती.
जम्मू येथे सैन्यात कार्यरत असलेला तालुक्यातील बाळसमुद्र येथील गणेश गजानन भंडारे हा स्वतःच्या लग्नासाठी सुटीवर गावी आला होता. परंतु भारत व पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या संरक्षणार्थ तातडीने तो आपल्या देशसेवेच्या कर्तव्यासाठी सीमेवर परतला आहे.
बाळसमुद्र येथील गणेश गजानन भंडारे हा युवक इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असतांनाच सैन्यात भरती झालेला आहे.
त्याचा विवाह ठरल्यामुळे तो जम्मू येथील अकनूर वरुन नुकताच काही दिवसांपूर्वी सुटीवर गावी आला होता. दि. 6 मे, मंगळवारी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील गजानन राऊत यांची मुलगी शिवानी सोबत त्याचा विवाह पार पडला.
त्यानंतर नवरीला घरी आणत असतांना सुखी संसाराची स्वप्ने दोघांनी पाहिली. परंतु, लग्नाची हळद फिटत नाही तोच काल दि. 9 मे, शुक्रवारी तो आपल्या देशसेवेच्या कर्तव्यासाठी सीमेवर परतला आहे. परततांना कठीण काळात देशसेवेपेक्षा कोणतेही मोठे काम नसल्याचे म्हणत, कुटूंबीय, मित्र व ग्रामस्थांना धीर देत देशसेवेचा स्वाभिमान बाळगून गणेश भंडारे आपल्या कर्तव्यावर परतला आहे.