बुलढाणा, 10 मे ( गुड इव्हिनिंग सिटी) : कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिराने लग्न लावणे हे फॅशनच होऊ पाहत आहे. याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक लग्न दोन-तीन तास उशीरा लागत आहे मग लग्न मुहूर्त काढतात कशाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच जेव्हा एखादे लग्न मुहूर्तावर लागत असेल तर कौतुकासह भुवया उंचावणार नाही तर काय! काल, शुक्रवारच्या संध्याकाळी बुलढाणा शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस यांची सुपुत्री तेजस्विनीचे लग्न घडाळ्याच्या ठोक्यावर लागले… अगदी वेळेवर आणि मुहूर्तावर पार पडले. मग काय! चर्चा तर होणारच…
यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. पारा 38 ते 42 अंशांच्या दरम्यान असतो. मुहूर्त टळून जातो, लग्न उशिरा लागते, मग वरपिता आणि वरमाय या दोघा उभयतांची भेट घेऊन काही पाहणे उपस्थित असल्याची हजेरी नोंदवत अन मुहूर्त जास्त असल्याने पुढच्या लग्नासाठी गुपचूप काढता पाय घेतात, असेही प्रकर्षाने दिसून येत आहे.
सद्यस्थितीत सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही होते. तरी नातेवाईक, आप्तमंडळी, सगेसोयरे कामधंदे सोडून लग्नाला हजेरी लावतात. पण वरपिता-वधूपिता व नवरदेवाचे कलवरे यांना याचे काहीच सोयरसुतक नसते. येणार्या पाहण्यांची काळजी नसेल तर अशा लग्रात थांबण्यात काय अर्थ? लोक काही फक्त जेवायला येत नाहीत, आनंदात सामील होण्यास येतात, वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार होण्याची गरज सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे. मुहूर्त काढलाच तर मग दोन पाच मिनिटे इकडे की तिकडे समजू शकतो. लग्नाला तब्बल दीड-दोन तास उशीर होत असेल तर संबंधितांना वेळेची कदर नाही, असे दिसते. त्यामुळे मुहर्ताचे पाखंड कशाला? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
बुलढाणा नगर पालिकेचे माजी नगरसेवक तथा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस यांच्या मुलीचा विवाह सोहळा काल शुक्रवार, 9 मे रोजी शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. काकस यांची मुलगी तेजस्विनी व कल्याण येथील शिर्के परिवाराचे सुपुत्र चि. दर्शन यांचा विवाह सोहळा नियोजित महुर्तावर म्हणजे 7 वाजून 45 मिनिटाला सुरू झाला. या लग्नाचे वैशिष्टय म्हणजे वेळेवर लग्न लागले. कारण आता लग्न पत्रिकेवरच छापण्यासाठी महूर्ताची आवश्यकता आहे की काय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दीड दोन तोस उशीराने लग्न लागत आहे. परंतू दत्ताभाऊ काकस हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय व समाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे अनेक दिग्गजांची या विवाह सोहळयाला उपस्थिती होती. परंतू कुणाचाही सत्कार त्याठिकाणी करण्यात आला नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांच्या वतीने प्राथमिक स्वरूपात केवळ मोजून दोन मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा दिल्यात. वधूपिता दत्ताभाऊ यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, हल्ली लग्न वेळेवर लागल्यामुळे उपस्थित मंडळी तटकळत राहतात. प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे.जेव्हा लग्न उशिरा लागतात तेव्हा आपणच मनातून संतप्त होतो. मग लोकांना ब्रम्हज्ञान सांगताना आपण कोरडे पाषाण होता कामा नये. जर मी माझ्या घरचे लग्न वेळेवर लावले तरच मला इतरांच्या लग्नात झालेल्या उशिराबाबत बोलण्याचा अधिकार राहील. समाजात याबाबत जागृती व्हावी आणि आदर्श प्रस्थापित व्हावा यासाठीच वेळेवर लग्न लावले अशी प्रांजळ प्रतिक्रिया श्री काकस यांनी दिली. वर्हाडी मंडळींनी काकस व शिर्के परिवाराचे कौतुक केले.