मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय आहे कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ?
बुलढाणा, 16 मे (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) ः ‘कार्यकर्त्यांच्या आशिवार्दामुळे पक्षाला चांगले दिवस आले आहेत.. कार्यकर्त्यांमुळेच भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे’, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले. सोबतच अपेक्षाही व्यक्त केली की, कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख व्हावे.. पक्ष कार्यालय जनसामान्यांना आपले हक्काचे घर वाटले पाहीजे.. आपल्या जीवनातील आकांक्षा, अपेक्षा, आशा पूर्ततेसाठी कुणाकडे जायचे असेल तर या कार्यालयात गेल्यानंतर पूर्ण होवू शकेल, अशी व्यवस्था कार्यालयाने उभी केली पाहीजे’, असेही श्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
आज, शुक्रवार, 16 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाण्यात एआरडी मॉलच्या मागील भागात बुलढाणा जिल्हा भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेताताई पाटील, जिल्हाप्रमुख विजयराज शिंदे, सचिन देशमुख, भाजप नेते विनोद वाघ, प्रवक्ते विनोद वाघ यासह अनेक भाजपा नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष, कार्यकर्ता आणि राज्याच्या विकास या तिन मुद्यांना घेवून देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होते. प्रारंभीच ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याचे स्वतःचे घर व्हावे… कार्यालय हे पक्षाचे घर आहे.. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की, माझ्या पक्षाचे घर झाले पाहीजे.. म्हणून पक्षाने निर्णय घेतला की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालय झाले पाहीजे.. मागील चार ते पाच वर्षांपासून जमीनी शोधत होतो.. येत्या काळात भाजपचा एकही जिल्हा असा असणार नाही, की ज्याठिकाणी पक्षाच्या मालकीचे, स्वतःचे घर त्या जिल्ह्यात नसेल.
मालक तुम्हीच..!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभावी विचार मांडले की, पक्ष कार्यालय आपण किती भव्य करतो, किती सुंदर करतो याहीपेक्षा त्याठिकाणी कार्यकर्त्याचा राबता किती आहे. या कार्यालयामध्ये जनसामान्यांना आपलसं वाटणारं वातावरण तयार करतो की नाही, यावर या कार्यालयाची भव्यता ठरेल. या कार्यालयाचं कुणीच मालक नाही.. मी नाही, चैनुभाऊ नाही, ताई नाही, विजयराज नाही किंवा कुणीच नाही.. तुम्ही सगळं मिळून या कार्यालयाचे मालक आहात’, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
इतर पक्षांसारखे बोगस सदस्य नाहीत
‘पक्षाला कार्यकर्त्यांच्या आशिर्वादामुळे चांगले दिवस.. जगातला सर्वात मोठा पक्ष आपला आहे’, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. दीड कोटी सदस्य एकट्या महाराष्ट्रात करून पक्षानेनवा विक्रम केला आहे. इतर पक्षांसारखी आमची बोगस व्यवस्था नाही.. आमचे बोगस सदस्य नाही.. प्रत्येक सदस्य डिजीटली व्हेरीफाईड असल्याने खोटा सदस्य करण्याची आपल्याकडे व्यवस्थाच नाही, असा टोलाही त्यांनी इतर पक्षांचे नांव न घेता लगावला.
तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प महत्वाकांक्षी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला औद्योगिक, शेतीपूरक, सिंचीत राज्य अशी ओळख देण्याचा संकल्प केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना अत्यंत वेगाने पुढे नेत आहोत. जिगांवचे काम तर पूर्ण होत आहेतच पण वैनगंगा नळगंगा नदीजोड देशातील सर्वात मोठा प्रकल्पही पूर्ण करतोय.. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशला जावून तापी बेसिन मेगा रीचार्ज प्रकल्प मंजूर केला. हा प्रकल्प बुलढाणा, अकोला, अमरावतीला मोठा फायदा देणारा असून खारपाण पट्ट्याला याचा विशेष लाभ होणार आहे. चारही बाजूने शेतकरयांसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा भर असून सर्वत्र रस्त्याचे जाळे, उद्योगाचे जाळे विणायचे आहेत. जेणेकरून येणारया पिढीच्या हाताला काम मिळाले पाहीजे, असा उद्देश्य आहे. श्री फडणवीस पुढे म्हणाले की, सगळयांच्या सहकार्याने सरकार अत्यंत वेगाने काम करीत आहे. नुकताच 100 दिवसांचा कार्यक्रम झाला आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याही कार्यक्रमात प्रशासनाचे ट्रान्सफॉर्मेशन दिसून येईल.
हवामान खराब असल्यामुळे मोठी सभा टाळली
मुख्यमंत्र्यांनी जोर देवून सांगितले की, भूमिपूजन कार्यक्रमासाठी मोठी सभा घ्यायची होती. पण ज्या हेलिकॉप्टरने आलो, त्याच्या पायलटने सांगितले की, वातावरण खराब असल्यामुळे लवकर निघावे लागेल अन्यथा हेलिकॉप्टर ठेवून जावे लागेल. त्यामुळेच छोटेखानी कार्यक्रम केला असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांची क्षमा मागितली. गर्दीमुळे भूमिपूजन मंडपातून आ. श्वेताताईंनी पत्रकारांना बाहेर जाण्याचे सांगितले होते. ‘तुम्हाला व्हिडीओ फूटेज उपलब्ध करून देवू’, असे ताईंचे म्हणणे होते. परंतु पत्रकार या गोष्टीमुळे नाराज होवून बाहेर पडले होते. ही गोष्ट कळल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी झालेल्या असुविधेबद्दल पत्रकारांची क्षमा मागतांना अगदी हसून म्हटले की, ‘तुम्ही आमचेच आहात. त्यामुळे नाराज होवू नका’. इतक्या मोठ्या पदावर असूनही अहंकारशून्य असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या विनयशीलतेची सुंदर चर्चा झाली.