बुलढाणा, 24 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : अवैधरित्या रेती तस्करीसाठी हप्ता म्हणून 14 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एएसआय गजानन माळीच्या घरी लाखो रुपयांची रोकड मिळून आली आहे. काल, सायंकाळी अँटीकरप्शन ब्युरो ने माळी याला रंगेहात पकडल्यानंतर बुलढाणा येथील त्याच्या निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली. आरोपी माळी यांच्या घरातून तब्बल 12 लाख 29 हजार पाचशे रुपयांची नगदी राशी मिळाली आहे. दरम्यान माळीला आज न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. एएसआय माळी हा स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी बुलढाणा या ठिकाणी कार्यरत आहे. मलकापूर येथील रेती वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका रेती व्यवसाय कला माळी याने दोन महिन्याचा हप्ता म्हणजे रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम 14 हजारावर निश्चित करण्यात आली होती. दरम्यान रेतीच्या या व्यावसायिकाने बुलढाणा अँटी करप्शन ब्युरो कडे न जाता अकोला एसीबीशी संपर्क केला. अकोला एसीबीचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांनी सापळ्याचे सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही यशस्वी केली. मलकापूर नांदुरा रोडवर मुंदडा पेट्रोल पंपाजवळ शिवनेरी धाब्या नजीक पीएसआय गजानन माळी याला 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रकमेसह रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई संध्याकाळी सहा वाजे दरम्यान पूर्ण झाली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती परिक्षेत्र मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात आणि श्री बहाकर यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार प्रदीप गावंडे, दिगंबर जाधव, संदीप ताले, असलम शहा यांच्या पथकाने पूर्ण केली. आरोपी माळीच्या विरोधात मलकापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार माळी यांच्यावर पंधरा वर्षाआधी अशाच प्रकारे एसीबीचा ट्रॅप झाला होता. एका काळी पिवळी वाल्याकडून माळी लाच मागत होते त्यावेळी एसीबीच्या ट्रॅकची कुणकुण लागल्यामुळे माळी घटनास्थळावरून फरार झाले होते अशी माहिती मिळत आहे. अर्थात या माहितीची गुड इव्हिनिंग सिटीकडून खातरजमा करण्यात येत आहे. आरोपी माळी याला पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने गणेश नगर येथील त्याच्या निवासस्थानी घराची झाडाझडती घेतली. त्यात पोलिसांना 12 लाख 29 हजार 500 रुपये नगदी मिळाले आहे. न्यायालयाने माळी याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास बुलढाणा एसीबीचे पोलीस निरीक्षक आर.डी.पवार करीत आहेत.