spot_img

बुलढाणेकर त्रस्त ! 24 तासांपासून ब्लॅकआऊट

◾ विजेचे ‘खटके’, नागरिकांना मात्र झटके

◾लाईट नसल्याने रात्रभर हजारोंचे जागरण

बुलढाणा, 13 जून (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : बुलढाणा शहर भारत पाकिस्तानच्या सीमेवर नाही आणि सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धसुद्धा नाही तरीही बुलढाणा शहरातील अध्यापेक्षा अधिक भागात ‘ब्लॅक आऊट’ची स्थिती आहे. गेल्या 24 तासांपासून शेकडो घरांमध्ये ईलेक्ट्रीक सप्लाय नसल्याने नागरिकांचे बेहाल आहेत. लाईट नसल्याने हजारो नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे तर आईस्क्रीम शॉपपासून ते इतर अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणचे डझनभर अभियंता आणि मोठ्या संख्येत कर्मचार्‍यांचे पथक ‘फॉल्ट’ शोधण्यासाठी रात्रभरापासून जागी आहेत परंतु कुठे ते यशस्वी झालेत तर कुठे अजूनही बगला खाजविण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. अर्थात फॉल्ट नेमका लाईनमध्ये की, आणखी कुठे ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी विजेच्या लपंडावामुळे इन्व्हर्टरची व्यवस्था केलेली आहे परंतु त्यांचीही ‘पॉवर’ टिकू शकलेली नाही.
यात शंका नाही की, काल शहरात संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास कोसळधार पाऊस पडला. विजाही कडाडल्या आणि जवळपास 50 पेक्षा अधिक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर कुठे फांद्यांनी विजेची तार तोडली. अर्थातच तेव्हापासून संपूर्ण शहरच अंधारात होते. महावितरणने साळसुदपणा दाखवित रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत पॉवर सप्लाय पूर्ववत होण्याचे ‘मॅसेज’ टाकले. वेळ माहित असल्याने लोकांनी दम धरला. पण काहीच भाग रात्री 12 वाजेपर्यंत सुरु झाले. अर्ध्यापेक्षा जास्त शहर रात्रभर अंधारलेलेच राहिले. गुड इव्हिनिंग सिटीला महावितरणच्या सुत्रांनी सांगितले की, सागवन परिसरातील चिमनी नाल्याजवळ बांबूची शेती आहे. त्याठिकाणी तारा तूटल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला. हा प्रवाह गणेश नगरच्या 33 केव्ही सबस्टेशनवर पोहोचतो आणि त्याठिकाणाहून गणेश नगर, बसस्टॅण्डच्या मागील भाग, मच्छी ले-आऊट, जयस्तंभ चौक, क्रीडा संकुल, बसस्टॅण्ड, आरास ले-आऊट असा मोठा परिसर जोडण्यात आलेला आहे. पावसानंतर मात्र मुख्य प्रवाहच खंडीत होता. मध्यरात्रीच्या सुमारास थोडी फार दुरुस्ती होवून चिखली रोडवरील सबस्टेशनवरून चिखली रोडचा भाग सुरु करण्यात आला. त्याठिकाणाहूनच शहरातील इतर भागातही ईलेक्ट्रीक सप्लाय सुरु करण्यासाठी प्रयत्न झाला. पण ओव्हरलोडमुळे दोनदा ट्रान्सफार्मर जळाले.
इकडे बांबूंमुळे गणेश नगर सबस्टेशन बंद होते. रात्रभर लोकांनी उकाडा सहन केला. पाऊस थांबला होता पण हवासुद्धा वाहत नव्हती. खिडकी उघडली की, मच्छरे आत येत होती. हजारो बुलढाणेकरांच्या रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. लहान मुलांची, गर्भवती महिलांची अवस्था खूप वाईट होती. प्रश्न हाच उपस्थित होत आहे की, महावितरणने पावसाळा पूर्व नियोजन का केले नाही? एकाच पावसात जर 24 तासापेक्षा अधिक पॉवर सप्लाय खंडीत होत असेल तर बुलढाणा महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री खटके यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, सागवनपासून गणेश नगरपर्यंत दोन किलोमिटरअंतरातील ईलेक्ट्रीक पोलवरचा फॉल्ट शोधणे सुरु असून आमचे पथक आणि खाजगी एजन्सी मिळून हे ऑपरेशन सुरु असल्याचे श्री खटके यांनी सांगितले.
वृत्त लिहेपर्यंत 25 तास उलटले होते. विजेचा पत्ता नव्हता. पण बुलढाण्याच्या महावितरणच्या इतिहासात एक दुर्दैवी रेकॉर्ड नोंदविला गेला, यात शंका नाही. महावितरणकडे चूका शोधण्यासाठीच्या तंत्रज्ञानाची कमतरता आहे की, निष्णात, तरबेज कर्मचार्‍यांची ? याचा आधी शोध घेणे गरजेचे आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत