◾आठच महिन्यात कायंदे आणि काझी यांच्यात वादाची गाठ??
देऊळगांव राजा, 23 जून (गुड इव्हिनिंग सिटी /पूजा कायंदे ) : खूप प्रसिद्ध शेर आहे ” वक्त पडा गुलिस्तां पर तो खून हमने दिया, अब बहार आई तो कहते हो तुम्हारा काम नहीं!”… हा शेर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनोज कायंदे यांना आमदारकी मिळवून देणारे ऍड. नाझेर काझी यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो की, नाही हे सांगता येणार नाही परंतु आ. मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या अनेक बॅनर वरून नाझेर काझी गायब आहेत. ही अजाणतेपणी झालेली चूक आहे की मुद्दामहून केलेला खोडसाळपणा याचे उत्तर स्वतः मनोज कायंदे किंवा ऍड. काझी देऊ शकतील. परंतु मतदारसंघातील अनेकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीचे लक्ष वेधल्यामुळे हा बातमी प्रपंच.
गेल्या ८ महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि दोन दिग्गजांना धक्का देत मतदारांनी सिंदखेडराजा मतदारसंघात बदल घडवून आणला आणि युवा नेते मनोज कायंदे यांना आमदार म्हणून मुंबईत पाठवले त्या विधानसभा निवडणुकीत खरे किंग मेकर म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी ठरले. परंतु २३ जून रोजी आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठीकठिकाणी शुभेच्छा जाहिरातीचे बॅनर लागले त्या एकही बॅनरवर राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि किंग मेकर ठरलेले जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचे फोटो डावलण्यात आले.
विधानसभा निवडणुका पूर्वी राजकीय क्षेत्रात अनेक उलट फेर झाल्याने पक्ष बदलीचे घटना घडल्या. पंचवीस वर्ष सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून डॉ राजेंद्र शिंगणे होते. त्यांनी निवडणुकीचे वेळेवर राष्ट्रवादी अजितदादा गट यांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गट जॉईन केला होता. म्हणून राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ही जागा कोणाला सुटणार अशी चर्चा रंगत असताना राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी यांनी काँग्रेसचे युवा नेते मनोज कायंदे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून घेऊन त्यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी केली आणि सर्व जबाबदारी अंगावर घेत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वस्व दावावर लावून उतरले. काझी यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी सर्व अडचणीला दूर करीत मनोज कायंदे यांना विजय करून देण्याचा निर्धार केला. निवडणुकीत रात्र दिवस एक करीत प्रत्येक समाजात डॉ राजेंद्र शिंगणे यांचा विरोध पत्करून मते मागितली. त्यांनी पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करीत असल्याने जनतेने त्यांचा सन्मान ठेवून दोन दिग्गजांना धक्का देत मनोज कायंदे यांना विजय मिळवून दिला. विधानसभा निकालानंतर मतदार संघात मनोज कायदे यांची विजयाची अनेक बॅनर झळकले होती. त्यात किंगमेकर म्हणून एडवोकेट नाझेर काझी उल्लेख करून त्यांना किंगमेकरची उपाधी देण्यात आली होती परंतु आठ महिने झाल्यानंतर आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा जाहिरातीचे बॅनर दिसले आणि त्यात चक्क राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंगमेकर नाझेर काझी आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह घड्याळ चिन्ह शोधूनही मिळाले नाही. शहरात या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक दिवाळीनंतर होणार आहे. जर खरंच काझी यांना डावलले जात असेल तर त्या निवडणुकीत या बॅनरबाजीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी अनावधानाने झालेली चूक असेल तरी गंभीर आहे, यात शंका नाही.