◾ संध्याकाळी गोवर्धन हॉलला या
बुलढाणा, 1 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : काही कलाकार आपल्या उच्च कोटीच्या प्रतिभेने हजारोंचे चाहते बनतात. प्रसिद्ध सरोद वादक आमीर खान यांच्यात चाहत्यांचे मन जिंकण्याची अनोखी कला आहे. असा महान कलाकार आज बुलढाण्यात सरोद वादन करण्यासाठी येत आहे. आज, 1 जुलै रोजी येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष अरुणाताई कुल्ली यांच्या संगीतमय आठवण कार्यक्रमात आमीर खान यांचे सादरीकरण आहे. सरोद वादनाचा हा कार्यक्रम गोवर्धन सभागृह, बुलढाणा अर्बन मुख्यालयासमोर या ठिकाणी सायंकाळी ठीक 6.30 वाजता आहे. अरुणाताई कुल्ली यांनी बुलढाणा शहरात 22 वर्ष विविध कार्यक्रमाचे आयोजन करून बुलढाण्यातील रसिकांना समृद्ध केले आहे. त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दरवर्षी अरुणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या अरुणाताई यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा अरुणाई पुरस्कार यावर्षी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष भाई मंजीतसिंग यांना देण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामाची दखल घेत यावर्षीचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सुजाता कुल्ली यांनी जाहिर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका बुलढाणाचे मुख्याधिकारी गणेश पांडे हे असणार आहेत. तर स्वरसाधना संगीत विद्यालयाचे अरविंद टाकळकर यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमासाठी बुलढाण्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तसेच संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्रिक्ष फाउंडेशनच्या सुजाता कुल्ली यांचेसह प्रगती सार्वजनिक वाचनालय तथा भगतसिंग क्रीडा ,सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.