लेकिन पहले मुरूम कौन डाला बे ?
बुलढाणा, 1 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : ‘विष्णूवाडी चौक झाला हड्डीतोडी चौक’, या मथळयाखाली गुड इव्हिनिंग सिटीने बातमी प्रकाशित केली होती. विष्णूवाडी चौकात आज सकाळी 12 जण चिखलावरून गाडी घसरल्यामुळे पडल्याची घटना होती. या बातमीची नगर पालिका प्रशासनाने दखल घेत काही मिनिटातच तेथील चिखल अग्निशमन दलाच्या मदतीने बाजूला केला आहे. बातमी प्रकाशित झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते नदीम शेख यांनी नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला सोबत घेवून जात ज्या ठिकाणी गाड्या घसरल्या त्या ठिकाणचा चिखल बाजूला करण्याची मागणी केली. परंतू तात्पुरती मलमपट्टी करून होणार नाही. तर त्याठिकाणी शाश्वत काम झाले पाहिजे. वर्षानुवर्ष तेथे पावसाळा आल्यानंतर गटार तुंबते. यामुळे अनेक नागरिक गाडी स्लीप झाल्यामुळे पडतात. यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाल्यची घटना घडल्या आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने तो रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी जोर धरत आहे.
गुड इव्हिनिंग सिटीने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर शहरातील विविध भागातील अनेक नगरिकांनी फोन व मेसेज करत गुड इव्हिनिंग सिटीचे आभार व्यक्त केले आहे.
दरम्यान या भागातील नगरसेवक तथा माजी न.प. उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, विष्णूवाडी चौकातील समस्या नेहमी फुटणार्या पाईपलाईनमुळे होत आहे. आता या ठिकाणी कायमस्वरूपी निराकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण चौकात काँक्रीटीकरण करून रस्ता व्यवस्थीत केला जाईल. यासंदर्भात गुड इव्हिनिंग सिटीमध्ये वृत्त झळकल्यानंतर तत्काळ मुख्याधिकारी गणेश पांडे यांची भेट घेवून समस्या मांडली असल्याचेही श्री जायभाये म्हणाले.
गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार नगरसेवकपदासाठी इच्छुक असणार्या एका युवा नेत्याने सदर चौकात मुरुम टाकला होता. अर्थात खड्डे बुजून वाहतूकीसाठी रस्ता नीट व्हावा, असा चांगला उद्देश्य सदर युवानेत्याचा असेल. पण झालं उलटंच.. मुरूमामुळे चौकात भयंकर चिखल झाला. त्याचा त्रास आज सर्वांना होत आहे. तात्पर्य समाजकार्य करतांना तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी ईलाज शोधला पाहीजे. अन्यथा आसमान से गिरे, खजूर में अटके, अशी अवस्था होते.