“विद्याविश्व”चा कौतुकास्पद विस्तार
बुलढाणा, १ जुलै ( गुड इव्हिनिंग सिटी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात 100 सैनिकी शाळा स्थापन करण्याचा केंद्र सरकारची योजना होती. त्यानूसार देशामध्ये विविध ठिकाणी केंद्र सरकारने स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळांना मान्यता दिलेल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बुलढाणा येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल या सैनिकी शाळेला स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळेला मान्यता मिळाल्यामूळे बुलढाण्याचे इतिहासात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. आता सैनिकी शाळेकडे राज्य सरकारची एक सैनिकी शाळा व केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाची स्वतंत्र सैनिकी शाळा राहणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय सैन्यदलात जास्तीत जास्त अधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून निर्माण व्हावे या उद्देशाने देशपातळीवर संरक्षण विभागाच्या अंतर्गत सैनिकी शाळा स्थापन करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. त्यानूसार संस्थेने 2022 मध्ये रितसर प्रस्ताव सादर केला होता. त्यानूसार केंद्रीय पथकाने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व सोईसुविधा व आतापर्यंत सैनिकी शाळेने देशाला दिलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांची बाब लक्षात घेऊन तपासणी केली होती. त्यानूसार सदर मान्यता नुकतीच प्राप्त झाली असून चालु शैक्षणिक वर्षापासून देशपातळीवरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दाखल होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याला हा बहुमान मिळाल्यामूळे राज्यातील मोजक्या सैनिकी शाळेमध्ये सातारा व चंद्रपुर या केंद्रीय सैनिकी शाळेसोबत आपल्या जिल्ह्यातील सैनिकी शाळेची तुलना होऊ लागली आहे.