बुलढाणा, 12 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः “जबाबदारीपूर्वक काम करणे हे तर अधिकार्याचे कर्तव्यच आहे.. काम करतांना जर अधिकाधिक लोकाभिमुख होवून केले तर परिणाम चांगले येतात.. जनतेच्या सकारात्मक सहभागाशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातील यश मिळू शकत नाही आणि लोकाभिमुख अधिकारी जनतेला प्रिय असतात”, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी येथे केले. बुलढाण्यातील कार्यकाळ पूर्ण केल्यावर श्री महामुनी यांची रत्नागिरी याठिकाणी बदली झाली आहे. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी जाण्यापूर्वी अप्पर पोलिस अधीक्षकांची पत्रकारांसोबत स्नेहभेट झाली. जिल्हा पत्रकार भवनमध्ये काल, शुक्रवारी या भेटीदरम्यान श्री महामुनी यांनी त्यांच्या कार्यकाळातील सुंदर अनुभवांना उजाळा दिला. पत्रकार आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात मदत झाली असल्याचेही ते म्हणाले. पोलिसांची प्रतिमा समाजासमोर मांडण्याचे काम पत्रकार करतात.. पत्रकार आरश्याचा धर्म निभावतात.. बुलढाण्यातील पत्रकारांनी आरश्याचा धर्म कधी सोडला नाही.. त्यामुळे कर्तव्यबद्धतेच्या मार्गावरून पोलिस प्रशासन ढळत नाही, असे गौरवोद्गार काढतांना अप्पर पोलिस अधीक्षकांनी बुलढाणेकर जनतेचेही सहकार्य आणि प्रेमाबद्दल आभार मानले. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी श्री महामुनी यांचा शॉल आणि बुके देवून सत्कार केला. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा मार्गदर्शक भानुदास लकडे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, परिषद प्रतिनिधी नितीन शिरसाट, प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष वसीम शेख, सचिव शिवाजी मामनकर, कोषाध्यक्ष ब्रम्हानंद जाधव, विभागीय संघटक रहेमत अली शहा, लक्ष्मण दंदाले व इतरांची यावेळी उपस्थिती होती.