बुलढाणा, 17 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो. सोफियान यांच्या विरोधात एका 32 वर्षे महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दहा दिवसांपूर्वी मोहम्मद सुफीयान यांनी बुलढाणा शहरातील एका स्वस्त धान्य दुकानदारकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दिली होती. याच दुकानदाराने षडयंत्र रचले असून विनयभंगाची तक्रार देणारी महिला दुकानदाराची सुन असल्याचे मो. सोफियान यांनी म्हटले आहे. शहर पोलिसांकडून गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती इकबाल नगर परिसरात तिच्या पती आणि दोन मुलांसह राहते. पती प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. मागील तीन दिवसांपासून मोहम्मद सोफियान तिच्या घरासमोरून चकरा मारत आहे. काल, 17 जुलै रोजी ती घरी एकटी असतांना दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास सोफियान घरात घुसला आणि वाईट उद्देशाने हात पकडून ‘तू मला आवडते.. तुझ्यासोबत थांबायचे’, असे म्हणून विनयभंग केला. तेव्हा मी त्याला लोटून दिले आणि जोरजोराने ओरडले त्यामुळे तो घाबरून पळून गेला. सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 (1), 78 (1), 333 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पीएसआय साळुंखे मॅडम करीत आहेत. दरम्यान सदर प्रकाराबाबत मोहम्मद सोफियान यांच्याशी गुड इव्हिनिंग सिटीने संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, महिलेच्या नावावर असलेले हे सरकारी स्वस्त धान्य दुकान तिचा मुलगा चालवत असून त्याच्याच बायकोने माझ्या विरोधात खोटी तक्रार दिली आहे. सदर राशन दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून गरिबांची पिळवणूक केली जात आहे. या गंभीर प्रकाराचे मी आणि माझ्या समवेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयापासून ते थेट मुंबई मंत्रालयापर्यंत तक्रार केलेली आहे. त्याचाच वचपा काढण्यासाठी माझ्या विरोधात सदर षडयंत्र केले असल्याचा आरोप सोफियान यांनी केला आहे. सदर दुकानदारा विरोधात कार्यवाही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही सोफियान यांनी दिला आहे.