बुलढाणा, 18 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा शहरात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सातत्याने सुरू असते. महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र म्हणून बुलढाण्याची ओळख आहे. शहरात येणार्या कलाकारांना रसिकांकडून दाद मिळतेच .पण कलाकारांचीही दाद बुलढाण्यातील दर्दी रसिकांना मिळते. याच श्रृंखलेत शब्दाखातर निमीत्याने गझल काव्य आणि अनोख्या गप्पांची मैफल घेऊन यामिनी दळवी, आकाश कंकाळ, विशाल मोहिते हे येणार आहेत. शब्दाखातर मध्ये येणार्या यामिनी दळवी लिहितात..
शब्द दोघांतला तडफडत राहिला
एक होता कवी बडबडत राहिला
फार व्याकूळ नसते नदी कोणती
प्रवाही झरा झुळझुळत राहिला
शब्दाखातर मधील दुसरे युवा गझलकार आकाश कंकाळ लिहितात..
उरात दाटतोच घन अधेमधे कधीतरी छळे तुझीच आठवण अधेमधे कधीतरी आणि बुलढाण्यातीलच विशाल मोहिते लिहितात. खूप दिवसांनी तुला मी पाहिले अन् खूप दिवसांनी पुन्हा आभाळ आले….
यापेक्षा ही सरस आणि मनाला भिडणार्या गझल आणि कवितांच्या अनोख्या मैफिलीचे आयोजन आज दिनांक 18 जुलै रोजी गोवर्धन सभागृह बुलढाणा या ठिकाणी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे. याकार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क.आहे. या मैफिलीसाठी बुलढाण्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. गणेश गायकवाड डॉ. वैशाली गजेंद्र निकम,कर्नल सुहास जतकर, रविकिरण टाकळकर यांनी केले आहे.